अहमदनगर

पोहेगाव : चोरीच, पण चक्क एटीएम मशिनची!

अमृता चौगुले

पोहेगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : एरवी एटीएममशीन फोडून नोटांची चोरी झाल्याचे सर्वश्रूत आहे, परंतु याहीपुढे मजल मारीत चोरट्यांनी चक्क बँकेचे एटीएम फोडून मशीन मधील सर्व रक्कम चोरली. चोरटे एवढ्यावरचं थांबले नाही तर त्यांनी चक्क एटीएम मशीनदेखील पळवून नेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे काल मध्यरात्री चोरट्यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडले. जाता-जाता एटीएम मशीनच पळविल्यामुळे पोहेगाव परिसरात घबराट निर्माण झाली आहे. व्यापारी संकुलात आघाडीवर असलेल्या या गावाच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

शनिवारी पहाटे 3 वा. चोरट्यांनी परिसरातील वातावरणाचा आढावा घेत इंडियन ओव्हरसीजच्या एटीएम मशिन रूममध्ये प्रवेश केला. लोखंडी टॉमी व इतर इलेक्ट्रिक साहित्याच्या आधारे त्यांनी आजुबाजुचे सर्व अँगल व मशीनची तोडफोड केली. साधारणतः चार ते पाच हे चोरटे असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही घटना बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. चोरटे कशा पद्धतीने चोरी करतात, याचे सर्व चित्रीकरण झाले आहे. एटीएम फुटल्याची माहिती पो. पा. जयंतराव रोहमारे यांनी शिर्डी पोलिसांना दिली. पो. नि. नंदकुमार दुधाळ, पो. ना. अविनाश मकासरे, पो. काँ. दळवी, बाबा आहेर, वर्पे घटनास्थळी दाखल झाले.

बँकेचे मॅनेजर बी. डी. कोरडे, राम गौर यांना याबाबत त्यांनी माहिती विचारली असता, शुक्रवारी संध्याकाळी बँकेची सुट्टी झाल्यावर बँकेत 1 लाख 32 हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. शिर्डी पोलिस स्टेशनने बँकेचे सीसीटीव्ही फुटेज शेजारील गौतम सहकारी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. चोरट्यांनी एटीएम मशीन खोलून नेण्यासाठी पिक अप गाडीचा वापर केला होता.

पोहेगावामध्ये पोलिस दुरुक्षेत्र सुरू करावे…

पोहेगाव परिसरात अवैध धंदे, चोर्‍यामार्‍यांसह आता चक्क एटीएम फोडण्यासारख्या घटना वारंवार घडत आहे. याकडे शिर्डी पोलिस स्टेशनचे पुरते दुर्लक्ष होत आहे. पोहेगाव पोलिस दुरुक्षेत्र चार वर्षांपासून कायम बंद असल्याने या घटना वाढत आहेत. वारंवार निवेदन, उपोषण ,आंदोलन करून देखील शिर्डी पोलिस याकडे लक्ष देत नाही. ही बाब चुकीची आहे. नागरिकांच्या मनामध्ये पोलिसांबद्दल असंतोष आहे असे शिवसेना नेते नितीनराव औताडे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.