अहमदनगर

नगर : लोणीत आजपासून राज्यस्तरीय महसूल परिषद

अमृता चौगुले

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  महसूल आणि वन विभागाच्या माध्यमातून नागरीकांची कामे पारदर्शकरित्या मुदतीत पूर्ण करण्याकरीता सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय महसूल परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. लोणी येथे 22 आणि 23 फेब्रुवारी 2023 रोजी दोन दिवसीय महसूल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रथमच ही परिषद लोणी सारख्या ग्रामीण भागात होत आहे. या परिषदेत राज्यातील पाचही विभागांचे अप्पर मुख्य सचिव, दोन्हीही विभागांचे प्रधान सचिव, जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरिक्षक, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक उपस्थित राहणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज बुधवारी (दि..22) होणार असून, परिषदेच्या समारोपासाठी गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

परिषदेत नवीन वाळू धोरण, आयसरिता 2.0, विविध प्रकारच्या दाखल्याचे वितरण, शासकिय जमीनींवरील अतिक्रमण, शर्त भंग, पानंद रस्ते, शिवार रस्ते, कब्जेपट्टयाने दिलेल्या जमीनींच्या शर्तभंगाबाबत, अर्धन्यायीक कामकाज, शत्रू संपत्ती अशा विविध विषयांवर अधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यात येणार असूनर ई-चावडी, ई-मोजणी, ई-पीक पाहाणी, ई-ऑफीस, सलोखा योजना, भूसंपादन, बिनशेती, तुकडेजोड, तुकडेबंदी अधिनियम अशा विविध विषयांबाबत अप्पर मुख्य सचिव, प्रदान सचिव, जमाबंदी आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपसचिव मार्गदर्शन करणार असल्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

यात मुख्यमंत्री कृषि सौर वाहीनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धोरण निश्चित करण्यात येणार आहे. गृह, उर्जा, गृहनिर्माण व पाटबंधारे या सचिवांसह राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांशी व इतर अधिकार्‍यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवाद साधणार आहेत. वाळू धोरणा बाबतचा मसुदा या परिषदेमध्ये निश्चित करण्यात येणार असून, या मसुद्यासाठी येणार्‍या सूचनांचा अहवाल विभागीय आयुक्त राधाकृषण गमे यांच्या अध्यक्षतेखालील समिती अंतीम मसुदा सरकारला सादर करणार आहे.
त्यानंतरच वाळूचे अंतीम धोरण जाहिर केले जाणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

महसूल परिषदेतून विकासाचा मसुदा ठरेल
लोणी येथे स्व.खासदार डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुढाकाराने आरोग्य परिषद झाली होती. या परिषदेतील मसुदा देशाच्या आरोग्य धोरणाचा भाग बनला होता. माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी कौतूक केलेल्या प्रवरेच्या 'पुरा' मॉडेलचे देशात स्वागत झाले. कृषी मंत्री आणि शिक्षण मंत्री असताना राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचे कार्यक्रमही या भूमीत झालेले आहेत. त्या दृष्टीनेच ही महसूल परिषद राज्याच्या प्रगतीचा, सामान्य माणसाच्या विकासाचा मसुदा निश्चित करण्यासाठी यशस्वी ठरेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT