अहमदनगर

कोळपेवाडी : रोहित्रांचा वीजपुरवठा सुरू करा : आ. काळे

अमृता चौगुले

कोळपेवाडी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी कालव्या लगतच्या गावतील रोहीत्रांचा वीज पुरवठा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असून किमान दोन तास कालव्या लगतच्या रोहीत्रांचा वीजपुरवठा सुरु करावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे.

कोपरगाव मतदार संघाच्या अनेक गावातील गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याच्या लगतच्या गावातील रोहीत्रांचा वीज पुरवठा 3 ऑक्टोबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी महावितरणला दिले आहे. त्यामुळे नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होवून पाण्याचे उद्भव देखील कोरडेठाक पडण्यास सुरुवात झाली आहे.

विहीर, बोअरवेलच्या माध्यमातून शिल्लक असलेले पाणी वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्यामुळे नागरिकांना व जनावरांना मिळणे दुराप्रास्त झाले आहे. त्यामुळे पाणी असून देखील शेतकरी व कालव्या लगत वास्तव्यास असणार्‍या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे या कालव्यांलगतच्या गावातील रोहीत्रांचा किमान दोन तास वीजपुरवठा सुरु करावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघात वाढत असलेल्या वीजेच्या भारनियमानामुळे शेतकर्‍यांपुढे अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. सर्वत्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांना विहिरी, बोअर वेल मधून उपलब्ध असणारे पाणी पिकांना व पिण्यासाठी देखील खंडीत वीजपुरवठ्यामुळे मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा व शेतकर्‍यांना कोणताही त्रास होणार याची काळजी महावितरणाने घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज वितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे अमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT