अहमदनगर

श्रीक्षेत्र सराला बेट राज्यातील आध्यात्मिक केंद्र : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

अमृता चौगुले

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  योगिराज गंगागिरी महाराज यांची तपश्चर्या, त्याग व साधनेतून निर्माण झालेले श्रीक्षेत्र सराला बेटाला महंत नारायणगिरी महाराज यांच्या आध्यात्मिक साधनेची बळकटी मिळाली. या महान सद्गुरूंच्या प्रेरणेने व श्रद्धेच्या बळावर लाखो भाविक या पवित्र भूमित येऊन नतमस्तक होतात. या भूमितून प्रत्येकाला वेगळी ऊर्जा मिळते. त्यामुळे श्रीक्षेत्र सराला बेट हे तिर्थक्षेत्र राज्यातील अध्यात्मिक केंद्र असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीच्या तिरावर वसलेल्या श्रीक्षेत्र सराला बेट येथे दि. 16 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान श्री हरीहर महायज्ञ, मंदिर जिर्णोद्धार व विविध देवा-देवतांच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. त्यानिमित्त व योगिराज गंगागिरी महाराज यांच्या 120 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित ध्वजारोहन समारंभात मार्गदर्शन करताना ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.
श्रीक्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमास खा. सदाशिव लोखंडे, आ. लहुजी कानडे, आ. रमेश बोरनारे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपकराव पटारे, जि. प. सदस्य शरदराव नवले, अशोक कानडे, सिद्धार्थ मुरकुटे, नारायणराव डावखर, कमलाकर कोते, रवी पाटील, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण, डॉ. रवींद्र कुटे, मधु महाराज, सचिन जगताप, जितेंद्र छाजेड, बाबासाहेब चिडे, संदीप शेलार, राधाकृष्ण आहेर, गणेश मुदगुले, डॉ. विजय कोते आदींसह हजारो भाविक उपस्थित होते.

ना. विखे म्हणाले, आजचे स्पर्धेचे युग आहे. देशाचे भविष्य असलेली तरुणाई सोशल मिडीयावर व्यस्त आहे. त्याचा त्यांच्या मनावर चांगला-वाईट प्रभाव होतोय. प्रेमाची जागा क्रूरता घेते काय? अशी भिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक ऐक्य टिकविण्याचे काम अध्यात्माने केले आहे. समाजमनावर सकारात्मक बाबींचा प्रभाव परमार्थातून होतो. परमार्थ हे समाधानाचे एकमेव साधन आहे. सामाजिक व्यवस्थेत चिंतन करणे, समाजाला चांगल्या मार्गावर नेण्याचे काम श्रीक्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज प्रभावीपणे करीत आहेत.

यावेळी खा. सदाशिव लोखंडे, आ. लहुजी कानडे, आ. रमेश बोरनारे यांची शुभेच्छापर भाषणे झाली. प्रारंभी प्रास्तविक ह. भ. प.मधु महाराज यांनी केले. मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना श्री हरीहर महायज्ञाचे पावित्र्य व मंदिर जिर्णोद्धारासह बेटातील विविध देव-देवतांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठेचे महत्व विषद केले. श्री हरीहर महायज्ञ सप्ताह नियोजनाची माहिती दिली. सुत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले. आभार सचिन जगताप यांनी मानले.

सप्ताहाबरोबर यज्ञात ताकद आहे : ना. विखे
योगिराज गंगागिरी महाराज यांनी शेकडो वर्षापूर्वी सुरू केलेल्या अखंड हरीनाम सप्ताहामध्ये ताकद आहे. हा सप्ताह यशस्वी करण्याचे दैवी सामर्थ्य त्यांच्यात आहे. त्यामुळे आजही हे सप्ताह 'गंगागिरी महाराजांचा सप्ताह' या नावाने ओळखले जातात. अशा सप्ताहाप्रमाणेच, महंत रामगिरी महाराज यांच्या पुढाकारातून होणारा 'श्री हरीहर महायज्ञ' लाखो भक्तांना ऊर्जा देणारा असल्याने हा न संपणारा यज्ञ आहे, असे मी मानतो, असे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

ध्वजारोहणाने भाविक मंत्रमुग्ध
श्रीक्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज व राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री हरीहर महायज्ञ सप्ताहाचे ध्वजारोहण झाले. यावेळी वेदशास्त्रसंपन्न चंद्रकांत गुरू, हरीशजी पैठणे, अरुण जोशी, निलेश जोशी व वैभव जोशी यांनी विधीवत मंत्रोच्चाराने केलेल्या पूजेमुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT