अहमदनगर

श्रीगोंदा बाजार समिती सभापतीपदी लोखंडे

अमृता चौगुले

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी अतुल लोखंडे यांची, तर उपसभापती पदी मनीषा मगर यांची निवड झाली. बाजार समितीवर माजी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने आपला झेंडा रोवला आहे. दरम्यान, जगताप गटाचे एक मत फुटल्याने विरोधी उमेदवारास मतदान करणारा तो संचालक कोण? याची आता चर्चा सुरू झाली आहे.

समितीच्या अठरा संचालकांपैकी अकरा सदस्य राहुल जगताप गटाचे निवडून आले, तर पाचपुते- नागवडे गटाला आठ जागा मिळाल्या. पदाधिकारी निवड तारीख निश्चित झाल्यानंतर जगताप गटाचे अकरा सदस्य सहलीला गेले. सभापती पदासाठी राहुल जगताप यांचे विश्वासू अतुल लोखंडे यांची निवड निश्चित मानली जात होती. दरम्यानच्या काळात साजन पाचपुते हेही स्पर्धेत उतरले त्यांच्यासाठी राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी लॉबिंग सुरू केले होते. एवढेच नाही, तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दरबारात हा विषय गेला होता.

काल सकाळी अतुल लोखंडे व मनीषा मगर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. त्या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पाचपुते-नागवडे गटाकडून सभापती पदासाठी प्रशांत ओगले, तर उपसभापती पदासाठी लक्ष्मण नलगे यांनी अर्ज दाखल केले. प्रत्यक्ष मतदानात अतुल लोखंडे व मनीषा मगर यांना दहा तर प्रशांत ओगले व लक्ष्मण नलगे याना आठ मते मिळाली. जगताप गटाचा एक संचालक फुटल्याने अंतर्गत संदोपसुंदी उघड झाली.

दोन्ही पदाधिकार्‍यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडत गुलालाची उधळण करत आपला आनंद व्यक्त केला.
यावेळी राहुल जगताप, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहटा, शरद जमदाडे, शिवप्रसाद उबाळे, दीपक भोसले, दत्तात्रय गावडे, ऋषिकेश गायकवाड यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

बाजार समिती निवडणुकीत जगताप गटाचे अकरा सदस्य निवडून आले.नागवडे-पाचपुते यांनी युती करूनही त्यांना सातच जागा मिळाल्याने साहजिकच पदाधिकारी निवडी दरम्यान फोडाफोडीचे राजकारण साध्य होते का? याची चाचपणी सुरू झाली.
जगताप गटाच्या दोन संचालकांवर दबाव आणन्याचा प्रयत्न झाला एवढेच नाही तर त्यांना आर्थिक आमिष दाखवून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न झाला. मात्र, संचालक ठाम राहिल्याने फोडाफोडीची डाळ शिजली नाही.

नूतन सभापती अतुल लोखंडे म्हणाले, माजी आमदार राहुल जगताप यांच्यामुळे मला संधी मिळाली. बाजार समिती ही शेतकर्‍यांची कामधेनू आहे. समितीत शेतकरी केंद्रबिंदू मानून आपण काम करणार आहोत. शेतकर्‍यांसाठी आश्वासक भूमिका घेऊन पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

फुटीर संचालक कोण?

जगताप गटाचे अकरा संचालक असताना पदाधिकारी निवडी दरम्यान घेतलेल्या मतदानात अकरा पैकी एक मत विरोधात गेले. विरोधी गटाला मतदान करणारा तो संचालक कोण? याबाबत तालुक्यात चर्चा सुरू आहे.

समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा

माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळविली आहे. मला सत्ता मिळू नये, यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.

'पुढारी'चा अंदाज तंतोतंत खरा

बाजार समिती निवडणुकीनंतर पदाधिकारी निवडीबाबत 'पुढारी'ने विश्लेषण प्रकाशित केले होते. सभापती पदी अतुल लोखंडे यांची वर्णी लागेल, असा अंदाज वर्तविला होता. आजच्या निवडीने हा अंदाज खरा ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT