सोपान भगत :
कुकाणा : नेवासा तालुक्यातील रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक म्हणून ओळख असलेल्या पिकांमधील कांदा लागवडीला सध्या तालुक्यात वेग आला आहे. शेतकरी कांदा लागवड करण्यात व्यस्त आहेत. संपूर्ण नेवासा तालुक्यात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यामध्ये पाचेगाव, बेलपिंपळगाव, भालगाव, प्रवरासंगम, वरखेड, गेवराई, भेंडा, देवगाव, तेलकुडगाव, माका, चांदा तुकाईशिंगवे, लोहगाव, तामसवाडी, खेडले परमानंद, कांगोणी, गोणेगाव, माळीचिंचोरा, भानसहिवरा, सलाबतपूर या महत्त्वाच्या गावासह परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये नेवासा मंडळामध्ये 1856 हेक्टर क्षेत्र, तसेच सलाबतपूर मंडळामध्ये 819 हेक्टर क्षेत्र, तसेच घोडेगाव मंडळामध्ये 1259 हेक्टर क्षेत्र, तर कुकाणा मंडळामध्ये 615 हेक्टर क्षेत्र, असे नेवासा तालुक्यात 4587 हेक्टर क्षेत्रामध्ये कांदा लागवड झाली आहे. सर्वाधिक नेवासा मंडळात, तर सर्वात कमी कुकाणा मंडळात लागवड झाली आहे. सध्याही मोठ्या प्रमाणात लागवडीचे काम वेगाने सुरू आहे.
काही अनुभवी शेतकर्यांच्या सांगण्यानुसार कांदा लागवडीपासून किमान दीड महिना कांद्याला थंडी मिळणे अतिशय महत्त्वाचे असते त्यामुळे कांदा उत्पादनात मोठी वाढ होते, जर कांदा लागवड जानेवारी महिन्यात झाल्यास उष्णतेच्या प्रमाणात वाढ होत असल्याने कांदा उत्पन्नात घट होण्याची भीती असते, म्हणून 1 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान केलेली कांदा लागवड उत्पन्नात वाढ देणारी असते; परंतु यावर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. शेतात नांगरट करण्यासाठी वापसा नसल्याने कांद्याचे रोप टाकण्यास उशीर झाल्याने कांदा लागवड करण्यासही उशीर झाला आहे. या हंगामात जानेवारी अखेरपर्यंत कांदा लागवड होण्याची शक्यता काही शेतकर्यांनी वर्तवत आहे. यातील मूळ कारण म्हणजे उशिरा लागवडीसाठी येणारे रोप, त्याचबरोबर एकाच वेळी सर्वत्र सुरू होत असलेल्या लागवडी. या लागवडीसाठी अपुरी मजुरांची संख्या हेही कारण असल्यामुळे यंदा कांदा लागवडीला उशीर होणार आहे. तसेच, अपुर्या मजुरांच्या संख्येमुळे कांदा लागवड करण्यासाठी भाव वाढीचा फटका शेतकर्यांच्या खिशाला झळ देणार आहे.
कांदा लागवड 1 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत व्हायला हवी, कारण कांदा पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी किमान दीड महिना कांदा पिकाला थंडी मिळण आवश्यक असते. त्यामुळे कांदा पोसण्यासाठी मदत होते. कांदा लागवड उशिरान झाल्याने उष्णताची तीव्रता वाढते व कांदा पोसला जात नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकर्यांच मोठे आर्थिक नुकसान होते.
-दशरथ ताके, कांदा उत्पादक, भानसहिवरासध्या शेतामध्ये काम करण्यासाठी मजुरांचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यातच कांदा लागवड ही वेळेत होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे सर्वच शेतकर्यांनकडून लागवड करण्यासाठी घाई केली जाते व याच गोष्टीचा मजुरांकडून फायदा घेतल्या जातो. वाढीव पैशाची मागणी केल्यामुळे शेतकर्यांना आर्थिक झळ सोसावी लागते.
– अशोक मतकर, कांदा उत्पादक, पाचेगावकांदा शाश्वत पीक नसून निसर्गावर अवलंबून पीक आहे. कांदा उत्पादनाला लागणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे व कांद्याचे दर निश्चित नसल्यामुळे कमी जास्त भावाचा फटका हा शेतकर्यांना बसतो कांदा भाव हा चार किंवा पाच हजार रुपये व्हावा, ही शेतकर्यांची कधीही अपेक्षा नसते; परंतु कांद्याला किमान दर अडीच ते तीन हजार रुपये क्विंटल कायमस्वरुपी मिळण्याची शेतकर्यांची अपेक्षा असते; परंतु दुर्दैवाने तसे होत नाही. उत्पादन खर्च निघनेही कठीण होत असल्याने शेतकरी अडचणीत येतात.
– लाला पटेल, कांदा उत्पादक, देवगाव