अहमदनगर

नगर : आश्रमशाळा, वसतिगृहांना जागा देणार : मंत्री विखे पाटील

अमृता चौगुले

लोणी/आश्वी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असलेल्या भागात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी आश्रम शाळा व वसतिगृहाच्या एकत्रित प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे ग्वाही पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिली. एकात्मिक आदिवासी प्रकल्पांतर्गत हसनापूर येथे सुमारे 13 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या वसतिगृह इमारतीचा भूमीपूजन समारंभ मंत्री विखे पा. व खा. सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रकल्प अधिकारी राजन पाटील, साबांच्या स. का. अभियंता एस. बी. गाडेकर, सरपंच छाया बारसे, एकलव्य आदिवाशी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रेवननाथ जाधव, प्रवरा बँकेचे संचालक किसनराव विखे, चेअरमन अशोकराव धावणे, आब्बास पटेल, दादासाहेब घोगरे, सरपंच पूनम बर्डे, बाजार समितीचे संचालक राहूल धावणे, उपसरपंच गणेश विखे, अनिल विखे, वकील संघाचे अध्यक्ष नितीन विखे आदी उपस्थित होते.

मंत्री विखे पा. म्हणाले, यापुर्वी समाज कल्याणच्या माध्यमातून विद्यार्थी- विद्यार्थिनीच्या वसतिगृह इमारतीचे झालेले काम सर्वांसाठी रोल मॉडेल ठरले. या इमारतीचा मास्टर प्लॅन राज्यातील इतर वसतिगृहांच्या इमारतीस उपयुक्त ठरल्याकडे लक्ष वेधून, नव्याने विकसित होणारी इमारत सर्व सुविधांनी परीपूर्ण करण्याच्या सूचना मंत्री विखे पा.यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

राज्य सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांकरीता महत्वपूर्ण निर्णय घेत अंमलबजावणी सुरू केली. संशोधनात्मक शिक्षणास शिष्यवृती योजना सुरू केली. उच्च शिक्षणास विद्यार्थी सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी येत असल्याने वसतिगृहाच्या इमारती अद्यावत व सर्व सुविधांनी परीपूर्ण असाव्या, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मंत्री विखे पा. यांनी नमूद केले.

शैक्षणिक सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी वसतिगृह उभारण्याचे सरकारचे धोरण आहे. काही भागात आश्रम शाळांच्या समस्या गंभीर असल्याने अधिकार्‍यांनी अचानक भेटी देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे पा. म्हणाले, आश्रम शाळा व वसतिगृहाचे प्रकल्प एकत्रित उभे करण्यास आवश्यक जागेची उपलब्धता करून देण्याची तयारी आहे. राज्यातील आदिवासी विभागात सुविधा उपलब्ध होत असल्याने या भागात नागरीक विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होत असलेल्या निर्णयांची माहिती समाजातील युवकांनी जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांनी केले.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT