राहाता : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राहाता तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. सोनवणे म्हणाले, ग्रामीण युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्परता दर्शवणारे, युवकांचे प्रेरणास्थान उपमुख्यमंत्री पवार यांच्या गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे. राहाता तालुक्यातील युवकांचे प्रश्न सोडविण्यास उपमुख्यमंत्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. उपमुख्यमंत्री पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तरुण पिढीचे नेते ओळखले जातात. रोखठोक व थेट बोलणारे व तत्काळ निर्णय घेणारे नेते अशी त्यांची ओळख आहे.
जनतेच्या सेवेस तत्पर नेते म्हणून ते ओळखले जातात. त्यांचा स्पष्टवक्तेपणा तितकाच प्रभावी आहे. स्पष्टवक्तेपणातून ते मोठ-मोठ्या नेत्यांना राजकारणाचे धडे देतात. वेळेचे बंधन पाळतात. मंत्रालयात किंवा अन्य ठिकाणी वेळेत पोहचणे ही त्यांची खासीयत आहे. राजकीय काम करताना गोरगरीबांना न्याय मिळवून कामे वेळेत पूर्ण व्हावी, या हेतूने आम्ही उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत काम करणार असल्याचे सोनवणे म्हणाले.