नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत सरासरी 30 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे गेल्या सव्वातीन महिन्यांत जिल्ह्यात सरासरी 223.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत 466.8 मिलीमीटर म्हणजे शंभर टक्के पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 54 टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप हंगाम वाया जाणार असून, यंदा पिण्यासाठी पाणी आणि जनावरांसाठी चार्याचा तुटवडा भासणार आहे.
गेल्या चार वर्षांत दिलासादायक पाऊस झाला. त्यामुळे लहान मोठी धरणे ओव्हर-फ्लो झाली होती. नद्या, नाले, ओढे वाहिल्यामुळे भूजलपातळी वाढली. त्यामुळे या चारही वर्षांतील खरीप आणि रब्बी हंगाम जोमात होते. गेली चारही वर्षे पाण्याचा सुकाळ होता. यंदा मात्र पाण्याचा आणि चार्याचा दुष्काळ निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावली आहे. यंदाचा पावसाळा झोप उडविणारा ठरला आहे. सव्वातीन महिन्यांत 350.1 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र फक्त 223.8 मिलीमीटर पाऊस झाला. यंदा दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी, नाले व ओढे वाहिले नाहीत.
त्यामुळे गावागावांतील छोटे मोठे तलाव व पाझर तलाव कोरडेठाक पडले आहेत. दमदार पावसाअभावी भूजलपातळी वाढली नाही. त्यामुळे विहिरीची पाणीपातळी ऐन पावसाळ्यात खालावली आहे. गोदावरी खोर्यातील भंडारदरा, मुळा, निळवंडे व आढळा या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे चारही धरणे गळ्यापर्यंत भरली आहेत. या धरणांच्या लाभक्षेत्रात पावसाने गुंगारा दिला. त्यामुळे लाभक्षेत्रातील खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी यंदा आवर्तन सोडावे लागले आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार आहे.
यंदाचा पाऊस (मिलीमीटर) कंसात गेल्या वर्षीचा पाऊस
नगर 247 (445.2), पारनेर 225.6 (452.3), श्रीगोंदा 222.3 (468.1), कर्जत 223.7 (442.2), जामखेड 334.8 (386.1), शेवगाव 263.8 (452.6), पाथर्डी 294.5 (408.5), नेवासा 222.5 (408.4), राहुरी 116.6 (444.9), संगमनेर 135 (440.1), अकोले 354 (745.9), कोपरगाव 165.4 (496.3), श्रीरामपूर 134.9 (425.2) , राहाता 182.7 (476.7).