अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ जिल्ह्यातील विटाळवाडी (ता.पुसद) येथे किरकोळ कारणातून दोन जणांचा खून करण्यात आला होता. या दुहेरी खुनातील पसार झालेल्या सहा आरोपींना नगर एलसीबीच्या पथकाने गुरुवारी (दि.20) मोठ्या शिताफीने पकडले. नगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्याने मालवाहू टेम्पोतून आरोपी नगरकडे येत असताना वांबोरी फाट्याजवळ एलसीबीच्या पथकाने आरोपींना सापळा लावून ताब्यात घेतले. पवन बाजीराव वाळके (वय 23), नीलेश दीपक थोरात (वय 24), गोपाल शंकर कापसे (वय 26), गणेश संतोष तोरकड (वय 21), गणेश शंकर कापसे (वय 24), अवी अंकुश चव्हाण (वय 22, सर्व रा. विटाळवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.
पवन वाळके व त्याच्या साथीदारांनी किरकोळ वादावरून कोयता व चाकूने मारहाण करून राहुल हरिदास केवटे व क्रिश विलास केवटे या दोघांचा खून केला होता. या प्रकरणी पुसद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पसार झाले होते. आरोपी मालवाहू टेम्पोतून छत्रपती संभाजीनगर रस्त्याने नगरच्या दिशेने जात असल्याची माहिती यवतमाळ पोलिसांना मिळाली होती. ही माहिती नगरच्या पोलिस अधीक्षकांना फोनवरून कळविण्यात आली. पोलिस अधीक्षक ओला यांनी एलसीबीचे प्रमुख दिनेश आहेर यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने वांबोरी फाट्यावर सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदीप पवार, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, शरद बुधवंत, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, फुरकान शेख, विशाल गवांदे, अमृत आढाव, रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. आरोपींना यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी पवन वाळके, नीलेश थोरात, गोपाल कपासे हे यवतमाळ जिल्ह्यातील सराईत आरोपी असून, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.