जामखेड : पुढारी वृतसेवा : एकल व निराधार महिलांना मदतीचा हात देऊन त्यांना सक्षम करण्याचा उद्देश आहे. सर्व मुद्यांवर सविस्तर माहिती घेऊन एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंचायत समितीतर्फे कृती कार्यक्रम आखला जाणार आहे. सर्व एकल महिलांनी तत्काळ ग्रामसेवकांकडे आपली नोंदणी करून घेण्याचे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले. 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी एकल, विधवा महिलांना आधार देण्याचे महत्वपूर्ण काम केले. तो वारसा पुढे नेण्यासाठी जामखेड तालुक्यातील सर्व गावांतील एकल महिलांची (विधवा, घटस्फोटित व परित्यक्ता) विशेष सभा ग्रामपंचायतमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
'अमृत पंधरवडा' या उपक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशाने एकल महिलांची नोंदणी केली आहे. काही महिलांची नोंदणी राहिली असेल, तर 3 जानेवारी पूर्वी करण्यात येणार आहे. 3 जानेवारीच्या बैठकीला महिला कार्यकर्त्या, बचतगट महिल मंडळ अध्यक्ष, शिक्षिका, ग्रामपंचायत सदस्यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे, असे पोळ म्हणाले.