श्रीरामपूर (नगर), पुढारी वृत्तसेवा: बाभळेश्वरकडून श्रीरामपूरच्या दिशेने जाणार्या झायलो वाहनाने पादचार्यास धडक दिल्याने तो गंभीर जखमी होवून जागीच कोसळला. सुदैवाने यावेळी महादेव यात्रोत्सवानिमित्त बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तत्काळ अॅम्बुलन्स बोलावून लोणी येथील रुग्णालयात हलविण्याने त्याचा जीव वाचल्याच्या भावना नांदुरकरांनी व्यक्त केल्या.
राहाता तालुक्यातील नांदुर बस स्थानकासमोर रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. वाहनाच्या धडकेमुळे पादचारी (वाघ पूर्ण नाव समजु शकले नाही.) रस्त्यावर कोसळला. यावेळी पो. नाईक साईनाथ राशीनकर, पो. ना. रघुवीर कारखीले, रमेश रोकडे, अमोल गायकवाड यांनी तत्काळ धावपळ करीत गावकर्यांच्या मदतीने जखमीस लोणी येथे रुग्णालयात हलविले. अपघातानंतर झायलो वाहन घटनास्थळावरुन निघुन गेले होते, परंतु त्यास ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, जखमी इसम नांदुर येथे पाहुणा आल्याचे समजते. रस्त्याच्याकडेने चालतना त्यास झायलोची धडक बसली.
रविवारी काशिविश्वेश्वर महादेवाच्या यात्रोत्सवानिमित्त पुणे येथील 'तुमच्यासाठी काय पण…' हा ऑकेस्ट्रा सुरु असताना अचानक काही अतंरावर अपघात झाल्याने मोठा जमाव रस्त्यावर जमा झाला. यावेळी नेमके काय झाले हे समजेना. मात्र तत्काळ पोलिस तेथे आल्याने जमाव पांगवून जखमीस मदत कार्य मिळून देण्यात आले.