अहमदनगर

संगमनेरात राष्ट्रीय योगासन स्पर्धेचा श्रीगणेशा ; 29राज्यांचे खेळाडू सहभागी

अमृता चौगुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  योग साधना ही भारताने विश्वाला दिलेली अमूल्य देणगी आहे. अखिल मानवास भारतामुळे हे वरदान लाभले, असे सांगत भारताला विश्वगुरू बनविण्याचे सामर्थ्य योगामध्ये दडले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी केले. संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सुसज्ज क्रीडा नगरीत तिसर्‍या राष्ट्रीय सब ज्युनिअर आणि ज्युनिअर योगासन अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ डॉ.मालपाणी यांच्या प्रमुख उपस्थित झाला. यावेळी डॉ. मालपाणी बोलत होते. उद्घाटक, खेलो इंडियाचे निरीक्षक शब्बीर शिकलकर, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर, तांत्रिक समिती संचालक रचित कौशिक, स्पर्धा व्यवस्थापक निरंजन मूर्ती, सतीश मोहगावकर, विश्व योगासन प्रतिनिधी अ‍ॅड. उमेश नारंग, डॉ. सी. व्ही. जयंती, पुखरंबम वीरप्रदास, शामलता व ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या अर्चना घोरपडे आदी उपस्थित होते.

डॉ.मालपाणी म्हणाले, राष्ट्रीय स्तर स्पर्धा आयोजनाची संधी संगमनेरला देऊन आमच्यावर मोठा विश्वास राष्ट्रीय योगासन फेडरेशनने टाकला. प्रत्येक खेळाडूला सुवर्णपदक मिळू शकत नाही, मात्र येथे त्यांना प्रचंड उपयुक्त ठरणारा अनुभव मिळणार असल्याचे ते म्हणाले.
संपूर्ण देशात 29 राज्यांमधून आलेल्या खेळाडूंच्या पथकांचे मैदानावर ध्वज संचलन झाले. डॉ. मालपाणी यांच्या हस्ते स्पर्धेचे ध्वजारोहण व योगासन गीताचे सादरीकरण झाले. सुरुवातीला ध्रुवच्या नृत्य पथकाने वंदे मातरम्च्या तालावर नृत्य सादर केले. तृप्ती डोंगरे या मागील वर्षीच्या सर्वोत्कृष्ट योगासनपटूने स्पर्धेची ज्योत मशालीद्वारे प्रज्वलित केली. महाराष्ट्र संघाचा कर्णधार रुपेश सांगे याने खेळाडूंना शपथ दिली.

बापू पाडळकर यांनी भव्य नीटनेटक्या आयोजनाबद्दल आयोजकांची प्रशंसा केली. 'खेलो इंडिया'चे निरीक्षक व उद्घाटक शब्बीर शिकलकर यांनी स्पर्धा सुरु झाल्याची अधिकृत घोषणा केली. शीला बन्सल यांनी हिंदीत तर अंजली जाधव यांनी इंग्रजीमध्ये सूत्रसंचालन केले.  महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशनचे राजेश पवार यांनी आभार मानले.

'जागतिक योगासन संघटनेचे अध्यक्ष योगर्षी स्वामी रामदेव महाराज व डॉ.एच.आर.नागेंद्र गुरुजी यांचे आशीर्वाद घेऊन उदित शेठ व डॉ.जयदीप आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली योगासन क्रीडा प्रकार जागतिक क्षितिजावर नेण्यास सर्वांच्या साथीने आम्ही कटिबद्ध आहे.
         डॉ.संजय मालपाणी,  राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे उपाध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT