वाळकी : पुढारी वृत्तसेवा : दोन गावेच नव्हे, तर नगर आणि पारनेर हे दोन तालुके जोडणारा हिवरे बाजार (ता.नगर) आणि दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) या दोन गावांच्या मधील शिव रस्ता मंगळवारी (दि.1) महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर खुला करण्यात आला आहे.
याप्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार, नगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील, पारनेर-श्रीगोंदाचे प्रांताधिकारी गणेश राठोड, नगरचे तहसीलदार संजय शिंदे, पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौंदाणे, टी. एस. उचाळे (मंडळ अधिकारी भाळवणी), श्रीमती हिरवे (मंडळ अधिकारी केडगाव), संतोष पाखरे (तलाठी, हिवरे बाजार), एम. बी. तराळ (तलाठी, दैठणे गुंजाळ) हे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील जुन्या काळातील दळणवळणासाठी महत्त्वाचे मानले जाणारे शिवरस्ते, पाणंदरस्ते काळाच्या ओघात हळूहळू नामशेष होत गेले आहेत. मात्र, या रस्त्यांमुळे गावेच नव्हे, तर गावातील लोकांची मने जुळण्याचे काम होत असल्याने, हे शिवरस्ते खुले होणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळेच राज्य शासन आता या रस्त्यांच्या कामासाठी निधीही खर्च करत आहे. मात्र, गावकर्यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे अनेक रस्ते अजूनही बंदच आहेत. मात्र, सर्वच बाबतीत संपूर्ण देशातील खेडेगावांना दिशा देणार्या हिवरे बाजारने आज पुन्हा एक नवीन आदर्श घालून दिला आहे.
प्रांताधिकारी सुधीर पाटील म्हणाले, दिवसेंदिवस रस्त्यांची समस्या गावोगावी वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत शेतमालक व ग्रामस्थ यांच्या सामंजस्याने शिवरस्ते खुले होऊ शकतात. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बाबा गुंजाळ, एस. टी. पादीर, रोहिदास पादीर, सहदेव पवार, अंशाबापू ठाणगे, सुभाष गुंजाळ, माधव झांबरे, शंकर गुंजाळ, मंजाबापू गुंजाळ, नवनाथ गुंजाळ, तसेच दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :