अहमदनगर

भाजप आमदाराकडून शरद पवारांचे कौतुक, उपस्थितांच्या भुवया उंचावल्या

अमृता चौगुले

अमोल गव्हाणे :

श्रीगोंदा : माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत. नेता कसा असावा हे शरद पवार यांच्याकडे पाहिले की लक्षात येते, अशा शब्दांत माजीमंत्री तथा भाजप आ. बबनराव पाचपुते यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. आ.पाचपुते यांनी पवारांचे केलेले कौतुक ऐकून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या नसतील तर नवलच.
काष्टी येथे कार्यक्रमासाठी शरद पवार शुक्रवारी आले होते. भाजप आ. पाचपुते हेही पवारांच्या व्यासपीठावर उपस्थित होते. समवेत महेश्वर मल्टिस्टेटचे अध्यक्ष दत्तात्रय गावडे, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, राजेंद्र नागवडे यावेळी उपस्थित होते.

शरद पवार आणि आ. पाचपुते यांचे नाते तालुक्यासह राज्याला माहीती आहेत. आ. पवार हेच आपल्यासाठी पांडुरंग असे म्हणणारे आ. पाचपुते यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान पवार यांच्याशी फारकत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. शरद पवार यांनी श्रीगोंदा तालुक्यातील पाचपुते विरोधकांना एकत्र आणत पाचपुतेंची कोंडी करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. गुरू- शिष्याच्या नात्यात काहीसे अंतर पडले. पण आज तालुकावसीयांना वेगळाच अनुभव आला. आ. बबनराव पाचपुते यांनी भाषणात शरद पवार यांचे कौतुक केले.
शरद पवार म्हणजे दिलेला शब्द पाळणारा नेता.

सत्तेत असो वा नसो शरद पवार नेहेमीच लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात पुढे असतात. मी खाजगी दूध डेअरी काढल्यानंतर अनेकानी शरद पवार यांच्याकडे माझ्या तक्रारी केल्या होत्या. त्यावर पवार यांनी मला बोलावून माझी बाजू समजून घेतली.त्यानंतर खाजगी दूध डेअरी सुरू करण्याबाबत पाठींबा दर्शवला. शरद पवार म्हणजे कार्यकर्त्यामधील गुणांची पारख करणारे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात हजारो माणसं घडवली, नव्हे देश घडविण्यात त्यांचा वाटा आहे.

शरद पवार यांचे बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष असते, नेता कसा असावा हे शरद पवार यांच्याकडे पाहिल्यानंतर समजते, अशी स्तुतीसुमने भाजप आ. पाचपुते यांनी उधळली. एकीकडे राज्यासह देशातील भाजप नेते शरद पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसताना श्रीगोंद्यात मात्र उलटेच चित्र दिसले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर गुरूवारी टीका केली अन् शुक्रवारी भाजप आ. बबनराव पाचपुते यांनी शरद पवार यांचे गुणगाण केल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे.

अन् त्यांचा आदर्श घेऊन पुन्हा कामाला लागलो
आ. बबनराव पाचपुते म्हणाले, मागील काही दिवसात आपण आजारी असताना अडचणी आल्या. पण त्या काळात पत्नी डॉ.प्रतिभा यांनी आपल्यासमोर शरद पवार यांचे उदाहरण मांडले. शरद पवार यांनी अनेक अडचणीतून पुढे जाऊन त्या अडचणींवर मात केली. त्याची प्रेरणा घेत मी पुन्हा कामाला लागल्याचे गुपीत आ. पाचपुते यांनी उलगडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT