सोनई(अहमदनगर ); पुढारी वृत्तसेवा : शनिशिंगणापूर येथे अमावस्या व शनिजयंती सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (दि.19) दिवसभरात दीड लाखावर भाविकांनी हजेरी लावून शनिदर्शन घेतले. सोहळ्यानिमित्त महायज्ञ सोहळा पार पडला. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे यावर्षी भाविकांची उपस्थिती कमी होती.
शनैश्वर देवस्थान ट्रस्टने शनिजयंती सोहळ्यानिमित्त जनकल्याणार्थ महायज्ञचे आयोजन केले आहे. तीन दिवसापासून यज्ञमंडपात पुरोहित हवनाचा विधी करीत आहेत. यजमान म्हणून शनिभक्त जयेश शहा (झिम्बाब्वेे), उद्योजक रामेश्वर सोनी (मुंबई) व विश्वस्त छबुराव भुतकर सपत्नीक हवनासाठी बसले आहेत. शनिजयंती व अमावस्या असल्याने शुक्रवारी पहाटे पासूनच शनिदर्शनासाठी गर्दी झाली होती.शनी चौथर्यास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
सकाळी 11.30 वाजता श्री क्षेत्र काशी येथून मोटारसायकल कावड यात्रेचे आगमन झाले. गावातून काशी व प्रवरासंगम येथून आलेल्या कावडीची मिरवणूक काढण्यात आली. काशी कावडीचे भक्त जगन्नाथ दरंदले, हनुमंत दरंदले व अन्य भक्तांनी शनिमूर्तीस जलाभिषेक केला. दुपारी बारा वाजता मूर्तीस वस्र व अलंकार घातले. जयेश शहा, सौरभ बोरा, रामेश्वर सोनी यांच्या हस्ते पूजन व मध्यान्ह आरतीचा सोहळा झाला. यावेळी उदयन गडाख, देवस्थानचे विश्वस्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराच्या बाजूला अभिषेक मंडप उभारण्यात आला होता. येथे अभिषेकासाठी दिवसभर भक्तांची गर्दी होती.
व्यंकी ग्रुपचे अध्यक्ष व्यंकटेश कुमार यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांचे स्वागत उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे, विश्वस्त अप्पासाहेब शेटे यांनी केले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त मंडळ व अधिकारी उपस्थित होते. शिंगणापूर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेली उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन देवस्थानच्या वतीने मंदिर परिसरात मंडप उभारून, जमिनीवर मॅट टाकण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने या वर्षीपासून मंदिराच्या आवारात डीजेबरोबर फटाक्यांना बंदी घालण्यात आली आहे.