अहमदनगर

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा : मंत्री विखे पा.

अमृता चौगुले

लोणी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान विश्वनेते नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सेवा पंधरवाड्याचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. यानिमित्त विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते गावपातळीवर नियोजन करणार असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी दिली.

संबंधित बातम्या :

या संदर्भात मंत्री विखे पा. म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सर्व देशवासियांसाठी अभिमानाचा क्षण असतो. पक्षीय स्तरावर सेवाभावी उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याची परंपरा यंदाही होणार आहे. सेवा पंधरवाड्यानिमित्ताने विविध समाज घटकांसाठी सामाजिक उपक्रमांचे आयोजन संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकीय, सामाजिक वाटचाल सर्वांसाठीच प्रेरणादायी अशी आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान अशा यशस्वी कारकीर्दीमध्ये त्यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांमुळे देशाचा नावलौकीक विश्वामध्ये पोहोचला. नुकत्याच झालेल्या ॠ-20 परिषदेच्या निमित्ताने 'वसुदैव कुटूंबकम्' हा त्यांनी दिलेला मंत्र आता संपूर्ण जगासाठी विकासाचा मंत्र ठरला आहे. यासर्व त्यांच्या यशस्वी वाटचालीचे प्रदर्शन या पंधरवाड्या निमित्त तालुका स्तरावर आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले.

रविवार दि. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून पीएम विश्वकर्मा योजनेचे लोकार्पण करणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगार, स्वच्छता कामगार, माती काम करणारे कारागिर, सोन्याचे दागिने तयार करणारे कारागिर तसेच विविध क्षेत्रात कार्यरत कामगारांसाठी कौशल्य विकास योजना जाहीर करणार आहेत. या कार्यक्रमात गावपातळीवर सर्व क्षेत्रात कामगारांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. यादृष्टीने पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी विधानसभा मतदार संघांमध्ये दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विशेष नियोजन केले आहे.

केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजनेचा तिसरा टप्पा नुकताच जाहीर केला. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरीकांना आरोग्याच्या सुविधा सहज उपलब्ध व्हाव्या, हा प्रयत्न आहे. यासाठी आयुष्यमान मेळावे, आयुष्यमान भारत योजनेकरीता नोंदणी शिबिरांचे नियोजन करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक समाज घटकाला देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत.

देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतीकारक, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवान यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी 'मेरी माटी मेरा देश' हे अभियान आयोजित केले जाणार आहे. प्रत्येक गावातून पंचप्राण शपथ घेवून माती संकलित करुन, दिल्लीत मुख्य कार्यक्रमासाठी पाठविण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले. यासर्व कार्यक्रमांच्या नियोजनासाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुथस्तरापर्यंत नियोजन करुन हा सेवा पंधरवाडा यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT