श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासून गेल्या 71 वर्षांमध्ये बेलापूर हे मोठ्या लोकवस्तीचे गाव सभापती पदापासुन वंचित राहिले आहे. या पार्श्वभूमीवर यावेळी बेलापूर गावाला बाजार समितीचे सभापतीपद द्यावे, अशी आग्रही मागणी गावकर्यांसह व्यापार्यांनी केली आहे. श्रीरामपूर बाजार समितीची स्थापना 1952 सालामध्ये झाली. बेलापूर उपबाजाराची स्थापना 1960 मध्ये करण्यात आली. बेलापूर बुद्रुक तालुक्यातील सर्वात जुने, लोकसंख्येने सर्वात मोठे तर तालुक्याच्या राजकारणात सर्वांधिक मतदार संख्या, जुन्या व्यापारी पेठेसह श्रीरामपूर शहराची जननी असलेले गाव आहे.
गावात उपबाजार असूनही गेल्या तब्बल 71 वर्षांपासून गावाला कधीच बाजार समितीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नेते मंडळींनी गावाची राजकीय, सामाजिक व व्यापारी पार्श्वभूमी विचारात घेऊन यंदा गावाला सभापतीपद द्यावे, अशी आग्रही मागणी बेलापुरगावातील नागरिकांसह व्यापार्यांनी केली आहे. दरम्यान, बेलापूर येथून दोघांपैकी नेमकं कुणाला मिळावी, हे मात्र स्पष्ट केले नाही. म
छोट्या गावांना पदे..!
आजवरच्या इतिहासात उंदिरगाव, भोकर, वळदगाव, टाकळीभान, पढेगाव, दत्तनगर, गुजरवाडी, गोंडेगाव या लहान गावांना बाजार समितीत नेतृत्वाची संधी मिळाली, मात्र जुन्या पिढीतील व्यापारी स्व. बद्रीनारायण साळुंके व हरकचंद बोरा यांचे उपसभापतीपद वगळता बेलापूर या मोठ्या गावास सभापती पद मिळाले नाही. गावचे 2 संचालक असतात. यंदाही दोघांना संधी मिळाली आहे.