नेवासा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील घोगरगाव येथील जुन्या गावठाणमध्ये गोदावरी नदीच्या काठावर पाच लाखांची वाळू उपशाच्या उद्देशाने असणारी यांत्रिक बोट महसूल विभागाला शुक्रवारी आढळून आली. याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना नदीपात्रातून वाळू उपसा करणार्या या यांत्रिक बोटीबाबत माहिती मिळाल्याने मंडलाधिकारी तृप्ती साळवे, कामगार तलाठी रामेश्वर गाडेकर, कोतवाल अशोक शिंदे हे शुक्रवारी सकाळी 9.45 वा. सुमारास कारवाईसाठी गेले होते. .
यावेळी महसूलच्या पथकाने घोगरगाव ता. नेवासा गावात जुने गावठाण सरकारी जागेमध्ये गोदावरी नदीपात्राचे काठावर महादेव मंदीरासमोर कोणीतरी अज्ञात इसमाने वाळु उत्खनन करण्याचे प्रयोजनासाठी एक यांत्रिक बोट बंद अवस्थेत यंत्रासह आणि लोखंडी पाईप आणि लोखंडी ड्रमसह ठेवलेल्या अवस्थेत मिळुन आलेली आहे. तलाठी गाडेकर यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी अज्ञात इसमाविरूध्द पाच लाखांची किंमत असलेल्या यांत्रिक बोटीबाबत गुन्हा दाखल केला आहे. नेवासा पोलिस तपास करीत आहेत.