इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश देण्याचा निर्णय झाला होता. त्यातील एक गणवेश स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आला. दुसरा गणवेश मात्र अद्याप देण्यात न आल्याने विद्यार्थ्यांना दररोज एकाच गणवेशावर शाळेत जावं लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शासन प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश वाटप करते. यावर्षीही दोन गणवेश देण्याचे सरकारने जाहीर केले होते. पहिला गणवेश उशिराने मिळाला. त्यावेळी कापड कापून दिल्याने तो शिवण्यास कमी कालावधी लागला. आता मात्र शासनाने प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन त्या प्रमाणात कापडाचे वाटप केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा गणवेश शिवण्यासाठी शंभर रुपये असा दर शासनाने ठरवून दिला आहे.त्यामुळे एवढ्या कमी शिलाईमध्ये गणवेश शिवण्यास कुणी तयार होत नसल्याने हे कापड अद्याप शिक्षण विभागाच्या कार्यालयात पडून आहे.
एकीकडे खासगी शाळांशी स्पर्धा करीत असताना शिक्षकांना शाळेतील पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण देत असताना शासनाने विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांवर लक्ष देणे तेवढेच आवश्यक आहे.
शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी नीलकंठ बोरुडे म्हणाले, पहिला गणवेश हा कट करून आल्याने तो शिवणे शक्य झाले. आता मात्र गणवेशाचे तागे आले आहेत. एक गणवेश शिवण्यासाठी शंभर रुपये शासनाने ठरवून दिले आहेत. तेवढ्या रकमेत कुणी गणवेश शिवायला तयार होत नाही . वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन याबाबत तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना आतापर्यत एकच गणवेश मिळाला आहे. शाळा सुरू होऊन चार महिने झाले विद्यार्थ्यांना एकाच गणवेशावर जावे लागत आहे. तातडीने दुसरा गणवेश उपलब्ध करून द्यावा.संग्राम भालेराव,पालक, आढळगाव