अहमदनगर

नगर : आज शिष्यवृत्ती परीक्षा; 13 हजार परीक्षार्थी

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत आज बुधवार दि. 21 डिसेंबर रोजी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आठवीच्या वर्गातील 13 हजार 469 विद्यार्थी आज ही परीक्षा देणार आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनात 33 केंद्रांवर परीक्षार्थीची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यावर्षी आज बुधवार दि. 21 रोजी ही परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेसाठी एकूण दोन पेपर असतात. बौद्धिक क्षमता चाचणी हा सकाळी 10.30 ते 12 आणि शालेय क्षमता चाचणी 1.30 ते 3 वाजेपर्यंतचा कालावधीत घेतला जाणार आहे.

जिल्ह्यात 33 परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक लिपिक शिपाई असे एकूण सुमारे 700 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
मागील वर्षीच्या परीक्षेसाठी 8891 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या तुलनेत शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी या परीक्षेसंदर्भात वेळोवेळी खाली सूचना केल्याने यावर्षी परीक्षार्थी संख्या वाढल्याचे दिसले. यंदा तब्बल 13 हजार 469 शिष्यवृत्ती परीक्षा देणार असून, पुढील वर्षी हा आकडा 20 हजारांच्या पुढे नेण्यासाठी कडूस यांनी मानस व्यक्त केला आहे. दरम्यान, आठवीच्या विद्यार्थ्यांच्या या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी माध्यमिक शिक्षण विभागाने बैठक व्यवस्थेची तयारी केलेली आहे. शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी परीक्षे संदर्भातील आवश्यक त्या सूचना उपशिक्षणाधिकारी, पर्यवेक्षक व कर्मचार्‍यांना केल्या आहेत.

परीक्षेचा हेतू अन् योजनेचे उद्दिष्ट

महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इ.8 वी मध्ये शिकत असलेलेच विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतात. विद्यार्थ्यांच्या पालकांची उत्पन्न मर्यादा 3.50 लाख असल्याबाबतचा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला यासाठी आवश्यक आहे. सन 2007-08 पासून आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्याथ्यार्ंचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या उच्च माध्यमिक स्तरापर्यतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी, आर्थिक दुर्बलतेमुळे विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

वर्षाला 12 हजारांची शिष्यवृत्ती

शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास पुढील वर्षासाठी दरमहा 1000 रुपयांप्रमाणे वार्षिक 12 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या खेरीज जे विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत पात्र होणार नाहीत, परंतु फक्त उत्तीर्ण होतील अशा मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, या संवर्गातील विद्यार्थ्यांना छत्रपती शाहूमहाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांच्या मार्फत वार्षिक 9600 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

SCROLL FOR NEXT