संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमगाव बुद्रुक गावासह सातगाव पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवहिनीची पाईपलाईन सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेली होती. त्यामुळे या सात गावांना प्रवरा नदीतून होणारा गोड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गेली तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे ही योजना कधी दुरुस्त होते, याकडे वरील सात गावातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
संगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुक निमगाव खुर्द, सावरचोळ, पेमगिरी, नांदुरी दुमाला, मिर्झापूर, शिरसगाव धुपे या सात गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने सांगवी येथील प्रवरा नदीपात्रातून मुख्य जलवाहिनी निमगाव बुद्रुक व निमगाव खुर्द या दोन गावांतील ओढ्या नाल्यातून गेलेली आहे. मात्र सप्टेंबर महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळेयाओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यामुळे या पाईपलाईनचे काही पाईप पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले होते. त्यामुळे ही मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली असल्यामुळे वरील सात गावांना परिसरातील ग्रामपंचायतीच्या स्थानिक स्त्रोतांतून पाणी पुरवठा केला जात आहे.
याबाबत सातगाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सोमनाथ गोडसे यांच्याशी दै. पुढरीच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, सांगवी येथील प्रवरा नदीपात्रातून निमगाव बुद्रुक गावाकडे येणारी मुख्य जलवाहिनी ओढ्यांमधून येत आहे. सदरच्या ओढ्यावर चार ठिकाणी नाले बांधलेले आहे. या नाल्यांमध्ये असणार्या पाईपलाईनवर सद्यस्थितीला 15 ते 20 फूट खोल पाणी आहे.
त्यामुळे नादुरुस्त झालेल्या पाईपलाईनचे लिकेज काढण्याचे प्रयत्न केले जात आहे. परंतु ओढ्या नाल्यात जास्त पाणी असल्यामुळे लिकेज काढणे अवघड होत आहे. पाणी पुरवठा योजना गेली सहा महिन्यांपासून नादुरुस्त आहे. त्यामुळे नांदुरी दुमाला सह सात गावात प्रवरा नदीवरून होणारा गोड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद आहे.