अहमदनगर

सरपंचाने अंगावर घातली गाडी ; शेतकर्‍याला जीवे मारण्याचा प्रयत्न

अमृता चौगुले

चिचोंडी पाटील/वाळकी : पुढारी वृत्तसेवा : सरपंचाने तहसीलदारांना खोटे शपथपत्र दिल्याबाबत तक्रार केल्याने, सरपंचासह त्याच्या साथीदाराने तक्रारदार शेतकर्‍याच्या अंगावर चारचाकी गाडी घालून, तसेच शिवीगाळ व मारहाण करत त्याचे डोके गाडीच्या बोनेटवर आदळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिलीप रामभाऊ कोकाटे (वय 48, रा. ससेवस्ती, चिचोंडी पाटील, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले की, सन 2015 साली आमच्या गावचे सरपंच शरद खंडू पवार यांनी तहसीलदारांना खोटे शपथपत्र दिले होते. त्याबाबत आपण तक्रार अर्ज केला होता. त्या अर्जाची 20 डिसेंबर 2023 रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. आपण केलेल्या तक्रार अर्जाबाबत सरपंच पवार यांच्या मनात राग होता.

मंगळवारी (दि.23) दुपारी कामानिमित्त दुचाकीवर नगरकडे जाण्यास निघालो होतो. चिचोंडी पाटील येथून नगर-जामखेड रस्त्याने जात असताना, मागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. धडक दिल्याने आपण गाडीसह खाली पडलो. त्यामुळे मला मुका मार लागला. मी उठून पाहिले असता, मला धडक देणारी गाडी पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला थांबली. त्यामधून सरपंच शरद पवार व सूरज किशोर भोज हे खाली उतरले. माझ्या जवळ येऊन शरद पवार म्हणाला, तू माझ्याविरुद्ध तक्रारी अर्ज करतो काय. तुला गाडीची धडक देऊनही तू अजून जिवंत कसा राहीला, मी तुला संपविल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी सूरज भोज याने मला शिवीगाळ करून माझे हात धरले व शरद पवार याने हाताने डाव्या डोळ्यावर, पाठीवर मारहाण केली व माझे डोके धरून त्याचे गाडीचे बोनेटवर आपटले. त्यावेळी तेथे जमलेल्या लोकांपैकी बबन विठोबा बेल्हेकर यांनी आमचे भांडण सोडविले. त्यानंतर शरद पवार व सूरज भोज हे तेथून निघून गेले, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी सरपंच शरद खंडू पवार व सुरज किशोर भोज या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT