अहमदनगर

संगमनेर: साडेतीन लाखाच्या सात मोटारसायकली पोलिसांनी केल्या हस्तगत

अमृता चौगुले

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: पोलीस उपाधीक्षक कार्यालयातील पथकाने चार अट्टल मोटरसायकल चोरांना पकडत त्यांच्याकडून संगमनेर तालुक्यातून २ आणि सिन्नर तालुक्यातून ५ अशा ३ लाख ५० हजार रुपये किमतीच्या ७ मोटरसायकली हस्तगत करण्यात पोलिस पथकाला अखेर यश आले आहे.

संगमनेर शहरातील गणेशनगर येथील ओम दिपक जानमाळी आणि चंदनापुरी येथील किरण रोहिदास राहणे यांची रायतेवाडी फाट्यावरील हॉटेल संकेतपासून मोटरसायकल चोरीला गेल्या होत्या. दोन्ही घटनेबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल होता. तसेच यापूर्वी अनेक मोटरसायकल चोरीला गेल्या होत्या, मात्र चोर काही सापडत नव्हते. त्यामुळे मोटरसायकल चोरांना शोधून काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

शहरात मोटरसायकलसह इतर चोरीच्या घटना घडत आहेत, त्या गुन्ह्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांनी संगमनेर उपविभागाचे पोलिस उपाधिक्षक संजय सातव आणि संगमनेर शहराचे पो. नि. भगवान मथुरे यांना आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील पोलिस नाईक आण्णासाहेब दातीर, पो का.अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे पो. कॉ. फुरकान शेख, शहर पोलीस ठाण्यातील पो. हे. कॉ. अमित महाजन, पो. ना. दत्तू चौधरी यांच्या संयुक्त पथकाने संशयावरून एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्याने जानमाळी आणि किरण राहणे यांची निमगाव टेंभी येथील सुमित संजय कदम याच्या मदतीने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्या मोटारसायकली मोबीन मुबारक शेख (वय 23 वर्ष), महंमद फरदिन नाजिर शेख (वय 21 वर्षे) यांना विक्री केली असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलीस पथकाने त्या दोघांकडून त्या दोन्ही मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत.

पोलीस पथकाने त्या दोघांना आणि त्या बालकास ताब्यात घेऊन त्यांची अधिक कसून चौकशी केली असता पाच मोटर सायकल नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात विकल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मोबीन शेख व महंमद शेख या दोघांना सिन्नर तालुक्यात घेऊन जात चार मोटरसायकल ताब्यात घेतल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT