नगर : पुढारी वृत्तसेवा : कोरोनानंतर पहिल्यांदा धुमधडाक्यात दिवाळी झाली. नगर शहरातील दुचाकी, चारचाकी वाहनांच्या दुकानातून आठवडाभरात दोन हजार वाहनांची विक्री झाली. मुर्हूत साधत ग्राहकांनी कोट्यवधी खरेदीचा अॅटमबॉम्ब वाजवत दिवाळी धमाका केला. पेट्रोल-डिझेलच्या किमती गणनाला भिडल्या तरी वाहन खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी होती. गत आठ दिवसांत परिवहन उपप्रादेशिक कार्यालयाकडे 1035 वाहनांची नोंदणी झाली, आणखी 1 हजार वाहने नोंदणीच्या रांगेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दसरा-दिवाळीचा खरेदीसाठी मुहूर्त महत्त्वाचा असतो. परंपरेनुसार दरवर्षी ग्राहक दिवाळी पाडवा व दसर्या विविध वस्तू, सोने, चांदी, वाहन खरेदी करतात.
गेल्या दोन वर्षांपासून सण उत्सवावर कोविडचे सावट होते. त्यामुळे दोन वर्ष बाजारात खरेदी-विक्रीची उलाढाल शांत होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात आली. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी होती. गेल्या आठ दिवसांमध्ये दुचाकी वाहनांमध्ये ग्राहकांनी इलेक्ट्रिक बाईकला पसंती दिली. तर, मोटारकारही मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे दिसून येते. सध्या परिवहन उपप्रादेशिक कार्यालयाकडे 1035 वाहने खरेदी झाल्याची नोंद आहे. त्यात टॅक्टर, मोटारसायकल, मोटारकार आदी वाहनांचा समावेश आहे. आणखी सुमारे एक हजार वाहनांची दुचाकीच्या शोरूममधून खरेदी झाल्याची माहिती समजली. मात्र, त्याची अद्याप परिवहन कार्यालयाकडे नोंदणी झालेली नाही.