अहमदनगर

सुप्यात होते आहे केशराची शेती

अमृता चौगुले

सुभाष दिवटे : 

सुपा : सुप्यात उभारले काश्मीर आणि थायलंड, असे म्हटल्यास नक्कीच भुवया उंचावतील. कारण.. हे शक्य झालेय..सुपा औद्योगिक वसाहतीत. संशोधकांनी सुप्यात काश्मीर आणि थायलंडसारखे वातावरण व पाणी कृत्रिमरित्या निर्माण करून केशर आणि मशरूमचे उत्पादन घेतले आहे. सुविधा लाईफसायन्सेस कंपनीसाठी संशोधक विनायक कुलकर्णी यांनी यश मिळविले आहे. संशोधक कुलकर्णी यांनी बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतल्यानंतर कोंबडीच्या पिसापांसून बायोडिझेल तयार करण्याचा प्रबंध यापूर्वी सरकारला सादर केला होता.

जगात काश्मीरी केशराला मोठी मागणी आहे. सुमारे साडेतीनsaf लाख रुपये किलोपर्यंत दर आहेत. महाराष्ट्रात काश्मीरी केशर पिकविण्याचे संशोधन कुलकर्णी यांनी सुपा औद्योगिक वसाहतीमधील सुविधा लाईफसायन्सेस कंपनीत हाती घेतले. दोन वर्षे संशोधन करून सुप्यात काश्मीरी केशर पिकविण्याचा देशातील पहिलाच प्रयोग यशस्वी केला. विशेष म्हणजे, काश्मीरी केशरमध्ये कोणतीही भेसळ करता येत नाही.

उद्योजक नाईक यांनी या संशोधनासाठी कर्ज काढून पैसा उभा केला. काश्मीरसारखीच हवा व पाण्यापासून अर्थात 'एरोपेनिक' पद्धतीने हे केशर विकसित करण्यात आले आहे. एका केशर बीजापासून 90 दिवसांत 5 किलो केशर सहज उत्पादित होते. दरम्यान, याच संशोधकांनी थायलंडमधून मशरुमचे बीज आणून सुप्यात मशरूम विकसित केले. सर्वसामान्य मशरूमची किंमत 300 ते 350 रुपये किलो आहे. मात्र, या मशरूमचे 1 किलो बीज 25 हजारांच्या घरात असून, उत्पादित मशरूमचा भाव एका किलोस सव्वा लाख रुपये आहे. या मशरूम पिकासाठीदेखील थायलंड सारखेच वातावरण व पाणी तयार करण्यात संशोधकांना यश आले.

काश्मीरप्रमाणेच निर्जंतुकीकरण
काश्मीर येथून 5 किलो बीज सुप्यात आणण्यात आले. बीजरोपणासाठी काश्मीरप्रमाणेच निर्जंतुकीकरण केलेले वातावरण, शुद्ध हवा व पाणीही काश्मिरीच निर्माण करण्यात आले. काश्मीरमध्ये कोणत्या महिन्यात कसे वातावरण असते, याचा संशोधकांनी अभ्यास केला.

मशरूमचा उत्तेजक म्हणूनही उपयोग
ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळांच्या स्पर्धेत खेळाडूंना हे मशरूम खाल्ल्यावर उत्तेजना मिळते. शिवाय उत्तेजन चाचणीतील आक्षेपार्ह पदार्थांमध्ये मशरूमचा समावेश नाही. एड्स व कॅन्सरग्रस्तांनाही मशरूमचा मोठा लाभ होतो. शरीरसौष्ठवासाठीही चांगला फायदा होत असल्याचे एका संशोधनामधून पुढे आले आहे.

सरकारने संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.जास्त पगारामुळे मुले बाहेरच्या देशात नोकरीसाठी जातात. सरकारने विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना आवश्यक साहित्य पुरवले पाहिजे. भारतीय मुले संशोधन कार्यात कोठेही कमी नाहीत.
                                                                     -विनायक कुलकर्णी, संशोधक.

आम्ही तयार केलेले काश्मीरी केशर देशातील पहिले यशस्वी संशोधन असल्याचा अभिमान वाटतो. यातून पैसे कमावण्याचा उद्देश नाही. सर्वसामान्य जनता, खेळाडू, रुग्णांना काश्मिरी केशराचा लाभ घेता यावा, हाच आमचा मानस आहे. उद्योजकांना कमी व्याजाने कर्ज आणि विकसित औद्योगिक वसाहतीत जागा मिळाली, तर मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता येईल. केशर, मशरूमसारख्या बीजांसाठी सरकारने करार केला, तर काश्मीरी केशर सर्वसामान्यांना चाखता येईल.
                                                            -सुनील नाईक, उद्योजक.

SCROLL FOR NEXT