अहमदनगर

काष्टी : देशासाठी गांधी घराण्याचे बलिदान : काँग्रेस जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे

अमृता चौगुले

काष्टी; पुढारी वृत्तसेवा : देशाला स्वातंत्र्यलढ्यात गांधी घराण्याचे मोठे योगदान आहे. देशासाठी गांधी घराण्याने बलिदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने देशाला उज्ज्वल भविष्य मिळवून दिले. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देत लोकशाही जिवंत ठेवली. परंतु, भाजप सत्तेवर आल्यानंतर संपूर्ण देशात लोकशाही ऐवजी हुकूमशाहीचे राज्य सुरू आहे, अशी टीका महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी केली.

काँग्रेसच्या वतीने राज्यात रविवारी (दि.26) राहुल गांधी यांच्या अपात्रतेबद्दल श्रीगोंद्यात निषेध सत्याग्रह सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महात्मा गांधी व स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नागवडे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्यानंतरही गांधी घराण्यावर संपूर्ण देशवासियांचे अतोनात प्रेम आहे. देशाच्या हितासाठी गांधी घराण्याचा समर्थपणे वारसा चालविणारे राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करून खासदारकी रद्द केली. हे भाजप सरकारचे मोठे षड्यंत्र आहे.

यापुढे लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सर्व देशवासीयांनी एकत्र येत आवाज उठवून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे.
श्रीगोंद्यात शनि चौकापासून अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा.धर्मनाथ काकडे यांनी या सत्याग्रह सभेचे आयोजन केले होते. नायब तहसीलदार नीलेश वाघमारे यांना देण्यात आले. यावेळी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते, नागवडे कारखान्याचे आजी-माजी संचालक उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT