अहमदनगर

शनिशिंगणापुरात भाविकांची मांदियाळी ; शनी चौथर्‍यावर आकर्षक विद्युत रोषणाई

अमृता चौगुले

सोनई : पुढारी वृत्तसेवा : नाताळ सुटी लागल्याने आठ दिवसांपासून शनिशिंगणापूरात शनिदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. आज शनिवार असल्याने सकाळपासून मोठी गर्दी झाली होती. शनी चौथरा फुलांची व फुग्यांची आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आमदार भरत गोगावले यांनी दुपारी शनिअभिषेक करत शनी मूर्तीचे दर्शन घेतले. आज दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरतीला मंदिरासह परिसरात भाविकांच्या गर्दीने सर्व रस्ते फुलून गेले होते. अनेक भाविकांनी पूजा साहित्य दराचे लावलेले फलक व प्रत्यक्ष विक्रीची किंमतीत मोठी तफावत असल्याचे सांगत व्यावसायिक मनमानी किमतीला पूजा साहित्य विकत असल्याच्या तक्रारी केल्या. मंदिर परिसरासह शिंगणापूरातील सर्व वाहनतळे वाहनांनी हाऊसफुल झाल्याने वाहनधारकांनी जिथे जागा मिळेल, त्या ठिकाणी वाहने लावल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.

'भाविकांना मास्कची सक्ती'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढत असल्याने देवस्थानतर्फे कर्मचार्‍यांना खबरदारीचा उपाय म्हणून मास्कची सक्ती करण्यात आली होती. भाविकांनाही मास्क वापरण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकावरून केले जात होते. देवस्थानचे विश्वस्त मंडळ, अधिकारी व कर्मचारी भाविकांचे स्वागत केले.

SCROLL FOR NEXT