अहमदनगर

बोटा येथे ग्रामीण रुग्णालय, ट्रॉमा सेंटर मंजूर : आ. सत्यजित तांबेंच्या प्रयत्नांना यश

Laxman Dhenge

घारगाव : पुढारी वृततसेवा : गेल्या पावसाळी अधिवेशनात डोळासणे, बोटा (संगमनेर) व वावी (सिन्नर) येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली होती. आता या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी करून हिरवा कंदिल दर्शविला आहे. नुकतीच बोटा येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे आता पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी ट्रामा सेंटर हे जीवनदायिनी ठरणार आहे.

राज्य सरकारच्यावतीने अपर सचिव कविता पिसे यांच्या सहीने आदेश शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणून बोटा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मंजुरी दिली. बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तीर्ण आवारात 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय साकारण्यात येईल. त्यासाठी जागा अधिग्रहण, नवीन इमारत बांधकाम व पदनिर्मितीबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. महामार्गांवरील अपघातांमधील जखमींचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी कधी करणार, अशी मागणी सातत्याने केली होती. अखेर बोटा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर यांना मंजूरी मिळाली असून लवकरच कामाला सुरूवात होणार असल्याचे समजते.

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. बोटा व वावी या दोन्ही ठिकाणी ट्रॉमा सेंटर मंजूर झाल्यामुळे या भागातील अपघातग्रस्त नागरिकांना तातडीने उपचार मिळतील. त्यांचे अनमोल आयुष्य वाचू शकेल. याकामी मला खारीचा वाटा उचलता आला, याचे मला समाधान वाटते.

– सत्यजीत तांबे, आमदार

हेही वाचा

SCROLL FOR NEXT