बोटा : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परीसरातून वाहणार्या मुळा नदी पात्रातून विविध साधनांच्या सहाय्याने रात्रीच्या अंधारात वाळू माफिया अमाफ वाळू उपसा करत असल्याच्या तक्रारी महसूल विभागात नागरिक करीत होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत घारगावचे तलाठी दादा शेख यांनी मुळा नदी पात्रात जाणार्या रस्त्यांवर जेसीबीच्या सहाय्याने आडवा चर मारीत सर्व रस्ते बंद करण्याची कारवाई केली. गेल्या अनेक दिवसांपासून महसूल मंत्री विखे पा. यांच्या कारवाईच्या आदेशाने अनेक कारवाया झाल्या, परंतु गेल्या महिनाभरात तालुक्यातील 37 ग्रामपंचायत निवडणुकीचे कामकाजात महसूल अधिकारी व कर्मचारी संबंधित कामात व्यस्त होते.
कारवाईचे वातावरण हळूहळू शांत झाले असल्याची चिन्हं दिसताच वाळू तस्करांनी डोके वर काढले होते. सरकारी आदेशाची पायमल्ली करीत वाळू तस्करीचा रात्रीस खेळ सुरू झाला होता. महसूल विभागात अधिकारी कामकाजात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत रात्रीच्या अंधारात विविध साधनांच्या सहाय्याने अमाफ वाळू उपसा जोरदार चालू होता. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. आ. राधाकृष्ण विखे पा. यांची महसूल मंत्रीपदी वर्णी लागली. त्यांनी अवैध गौण खनिज, बेकायदेशीर वाळू उपसावर कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे तुर्तास वाळू तस्करी थांबली होती, परंतू काही दिवस लपून बसलेले वाळू तस्करांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा गैरफायदा घेत पुन्हा डोके वर काढले होते. घारगाव परिसरात मुळा नदीतून जोरदार वाळू उपसा सुरू झाला होता. संपूर्ण राज्यात अवैध वाळू उपशाला बंदी असताना पठार भाग मात्र याला अपवाद ठरत होता.
महसूल मंत्री विखे पा. यांच्या कारवाईच्या आदेशाने वाळू तस्करांना पळता भुई थोडी झाली होती, परंतु या कालावधीत गौण खनिज पथक, पोलिस प्रशासन,तलाठी,सर्कल कोणीच लक्ष देत नसल्याचे वाळू तस्कराचे फावले होते. त्यातून जोरदार वाळू उपसा करत लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात होता. ज्या अधिकार्यांवर ही जबाबदारी आहे तेच अधिकारी ही गोष्ट विसरले की काय अधिकार्यांकडून सोयीस्कररित्या कानाडोळा केला जातो की काय, अशी चर्चा सर्व पठार भागात रंगत असताना नागरिक विविध माध्यमातून तक्रारी करत होते.
नागरिकांच्या विविध माध्यमातून आलेली तक्रारींची दखल घेऊन मंडल अधिकारी संजना भिंगारदिवे, तलाठी दादा शेख व कोतवाल शशिकांत खोंड यांच्या पथकाने घारगाव परीसरात असणार्या मुळा नदी पात्रात जाणारे सर्वच रस्त्यांवर जेसीबीच्या सहाय्याने आडवा चर मारत रस्ते बंद केले. नदी पात्रात ज्या ठिकाणी वाळू उपसा होईल तेथील जागेचा पंचनामा करीत संबंधितावर कारवाई केली, असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. महसूल पथकाकडून दोन ब्रासचा पंचनामा करण्यात आला. या कारवाईने महसूल प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.