अहमदनगर

पाथर्डी तालुका : करोडीत पिण्याच्या पाण्यासाठी रास्ता रोको; कर त्वरित सुरू करा

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील करोडी गाव व परिसरातील वाडी वस्तीसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर त्वरित सुरू करावे, या प्रमुख मागणीसाठी करोडी येथील पाथर्डी- बीड राज्य महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, गावचे सरपंच आश्रुबा खेडकर यांनी केले.

दीड महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीमार्फत पिण्याच्या पाण्यासंदर्भात टँकर सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीला प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. पंचायत समिती स्तरावर हा प्रस्ताव होऊन मंजुरीला जाणे अपेक्षित असताना पंचायत समिती प्रशासनाकडून ग्रामीण भागाच्या लोकांच्या जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्नासाठी अक्षरशः या प्रस्तावाला केराची टोपली दाखवल्यासारखा प्रकार झालेला आहे.

करोडी आणि परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाला आहे. पाण्यासाठी लोकांचे हाल होऊन पाण्यासाठी वन वन भटकंती होत असताना याची पूर्वकल्पना प्रशासनाला देऊनही टँकरद्वारे पाणीपुरवठा करायला पाहिजे होता, मात्र जून महिना उजाडला तरीही पिण्यासाठी पाण्याचे टँकर ग्रामस्थांना मिळाले नाही, अशी खंत आंदोलनकर्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले आहे. वेळोवेळी प्रशासनाला पिण्याच्या पाण्याबाबत निवेदन देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक होत शुक्रवारी सकाळी बीड-पाथर्डी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध व सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन केले.

रास्तारोको आंदोलनामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सरपंच आश्रुबा खेडकर, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, शुभम गांधी, योगेश गोल्हार,बाबुराव खेडकर, शिवनाथ वारे, विनायक चोरमले, भीमराव खेडकर, दिनकर खंडागळे, भगवान खेडकर, बाबासाहेब पाखरे,शेषराव गोल्हार,सतीश दहिफळे, राजेंद्र खेडकर, विजय गोल्हार, शहादेव खेडकर, पांडुरंग वारे आदींसह ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. पंचायत समिती व महसूल विभागाच्या प्रतिनिधींनी पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लाव असे आश्वासन दिल्यानंतर सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.पोलिस उपनिरीक्षक सचिन लिंमकर, गोपनीय शाखेचे भगवान सानप,किशोर लाड,आजिनाथ बडे, लक्ष्मण पवार, ईश्वर गर्जे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

SCROLL FOR NEXT