नगर; पुढारी वृत्तसेवा : नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेची विशेष सर्वसाधारण सभेसमोर आज 2014 ते 19 या सालातील तत्कालीन संचालकांचे सभासदत्व निष्कासन व परिणामी कलम 43 (1) अन्वये संचालक मंडळ सदस्य म्हणून अपात्र ठरविणे. कायदा कलम 47 अन्वये सन 2021 ते 2026 सालासाठी संबंधित निर्वाचित संचालक मंडळ सदस्यांचे निष्कासन करणे हे दोन महत्वाचे विषय ठेवण्यात आले होते. त्यास सर्व सभासदांनी नामंजूर नामंजूर अशा घोषणा देत विषय नांमजूर केले. तर, नामंजूरचे फलकही झळकाविले.
बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.पी.साळवे यांनी सभेच्या नोटिसीचे वाचन करून सभेच्या अध्यक्षपदी बँकेचे संचालक ईश्वर बोरा यांची नियुक्ती केली. त्यास संचालक सचिन देसरडा यांनी अनुमोदन दिले. त्याप्रमणे अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी सभेच्या कामकाजास सुरवात करून उपस्थित शेकडो सभासदांपुढे विषय पत्रिकेवरील दोन विषय मांडले. यावेळी व्हाईस चेअरमन दीप्ती गांधी, संचालक कमलेश गांधी, राहुल जामगावकर, संपत बोरा, गिरीश लाहोटी, संगीता गांधी, मनीषा कोठारी, अतुल कासट आदी उपस्थित होते.
बँकेच्या सभेला सुरूवात होताच सभासद राजेंद्र गांधी यांनी विषयांतर करीत काही प्रश्न उपस्थित करून सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीठासीन अधिकारी ईश्वर बोरा यांनी त्यांचे प्रश्न सभेपुढे घेऊ शकत नाही, असे सांगून गांधींचे प्रश्न फेटाळून लावत सभेच्या कामकाजास सुरवात केली. यावेळी जुन्या संचालकांना अपात्र ठरवणारा विषय नामंजूर होताच सभासदांमध्ये खाली बसलेले बँकेचे विद्यमान चेअरमन अशोक कटारिया, संचालक दिनेश कटारिया, अनिल कोठारी, अजय बोरा, मनेश साठे व राजेंद्र अग्रवाल आदींना व्यासपीठावर बोलावण्यात आले. दोन्ही विषय नामंजूर झाल्याने सर्व संचालकांनी सभासदांचे आभार मानले.