कोळगाव : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यामध्ये पावसामुळे, अतिवृष्टीमुळे रस्ते जागोजागी उखडले असून, मोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच खड्डे दुरुस्तीचे टेंडर मंजूर केले असून, त्या अंतर्गत तालुक्यातील खड्डे दुरुस्तीसाठी आठ पथके तयार केले असून, त्यांच्यामार्फत एकाच वेळी दुरुस्ती मोहीम राबविण्यात येत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत दै.पुढारीने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत कामास सुरुवात झाली आहे.
अतिवृष्टीने राज्यात सर्वत्र रस्त्यांची वाट लागली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले होते. अनेक अपघात होत होते. वाहन चालकांना आपली वाहने सुरक्षितरित्या या खड्ड्यातून बाहेर काढणे अवघड झाले होते. त्यामुळे तातडीने रस्ते दुरुस्ती आवश्यक होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने श्रीगोंदा तालुक्यामध्ये खड्डे दुरुस्ती करण्यासाठी नुकतेच निविदा काढली होती. त्यानंतर खड्डे दुरुस्तीची मोहीम सध्या तालुक्यात राबविण्यात येत असून त्यामध्ये सात ते आठ रस्ते दुरुस्ती पथके तयार करण्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व रस्ते एकाच वेळी दुरुस्तीसाठी घेण्यात आले आहेत.
यामध्ये खड्डे खडीने भरून डांबराचा वापर करून दुरुस्त करण्यात येत आहेत. एका पथकामध्ये साधारणपणे 15 ते 20 कर्मचारी असून खडी, डांबर व रोलरच्या साह्याने दुरुस्ती करण्यात येत आहे. सदरील खड्डे दुरुस्ती मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता बावस्कर, अभियंता पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असल्याची माहिती सुपरवायझर राजू मेहेत्रे यांनी दिली. सध्या एका दुरुस्ती पथकाचे कर्मचारी कोळगाव फाटा ते श्रीगोंदा या अंतर्गत येणार्या रस्त्याची दुरुस्ती करत आहेत. कोळगाव फाटा ते कोळगाव रस्त्याची दुरुस्ती अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आली असून, नियमानुसार खड्डे भरून खडी व डांबर यांचा योग्य वापर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोळगाव, सुरोडी, वडाळी या रस्त्याची दुरुस्ती चालू आहे.
तसेच, बेलवंडी फाटा ते बेलवंडी गाव, उक्कडगाव, देवदैठण याशिवाय विसापूर, पिंपळगाव, एरंडोली उक्कडगावपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती चालू आहे. त्याचबरोबर कोळगाव, कोथुळ, भानगाव, देऊळगाव या रस्त्याची दुरुस्ती सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय राजापूर माठ, मेंगलवाडी, ढवळगाव कोंडेगव्हाण, निंबवी, पिंपळगाव पिसा, घारगावपर्यंत रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.