पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी नगरपरिषदेने मंगळवारी सुरू केलेल्या अतिक्रमण मोहिमेला बुधवारी आठवडे बाजाराच्या दिवशी ब्रेक दिल्यानंतर गुरुवारी पुन्हा अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारीही ही मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. अनेक दिवसांपासून शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी मुहूर्त मिळत नव्हता.
मात्र, मंगळवारी पोलि बंदोबस्तात या मोहिमेचा सुरुवात झाली. बुधवारी आठवडे बाजार असल्याने अतिक्रमण काढण्याची मोहीम एक दिवस थांबविण्यात आली. ती पुन्हा बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे. पाथर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी गुरूवारी शेवगाव रोड, कोरडगाव रोड, नगर रोड या परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना अतिक्रमणे काढून घेण्याच्या तोंडी सूचना दिल्या. त्यानंतर अतिक्रमणधारकांनी आपली अतिक्रमणे, पत्रा शेड, टपर्या, कच्चे बांधकाम काढून घेत जागा मोकळी केली. या मोकळे जागेच्या ठिकाणी बांधण्यात आलेले सिमेंट काँक्रिटचे पक्के ओटे जीसीबीच्या साह्याने उखडून काढण्यात आले.
सोमवारी प्रशासनाने काढलेल्या अतिक्रमणांच्या जागेत पुन्हा काही व्यावसायिक येऊन व्यवसाय करताना निदर्शनास आले. त्यानंतर नगरपरिषद पथकाने तेथून त्यांना पुन्हा हटविले. फळ विक्रेत्यांनाही हातगाड्या काढण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. शहरातील अनेक ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे बाकी असल्याने काहींचे अतिक्रमणे काढली, काहींची काढली नाही, त्यामुळे नगरपरिषद प्रशासनावर लोकांची नाराजी दिसून आली. नगरपरिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारीही राबविली जाणार आहे. त्यामुळे उर्वरित अतिक्रमणे काढली जाणार का, हे स्पष्ट होणार आहे.
भाडोत्री गाळ्याचे अतिक्रमण काढण्यास पाथर्डी न्यायालयाने पाच जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. येथील व्यावसायिक असलम मणियार यांनी याबाबत 24 मे रोजी न्यायालयात नगरपरिषदेविरुद्ध याचिका दाखल केली आहे. मनियार यांच्या वतीने अॅड. सचिन बडे व अॅड. राणा खेडकर यांनी बाजू मांडली.