अहमदनगर

शेवगाव पाणी योजनेच्या आर्थिक निविदा उघडण्यास टाळाटाळ

अमृता चौगुले

रमेश चौधरी : 

शेवगाव तालुका : शेवगाव शहराच्या नवीन पाणी योजनेच्या 87 कोटींच्या कामासाठी पाच निविदा आलेल्या आहेत. यातील तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या असून, आर्थिक निविदा उघडण्यास टाळाटाळ होत आहे. ठराविक एका एजन्सीला या योजनेचे काम मिळावे, यासाठी काहींची धडपड चालू असल्याची चर्चा आहे. त्यात आर्थिक हितही जोपासण्याचा प्रयत्न होत असून, वरिष्ठ पातळीवरून दबावतंत्राचा वापर होत असल्याचेही बोलले जात आहे. हा सारा खेळ टक्केवारीसाठी तर नसावा ना, अशी शंका व्यक्त होताना दिसत आहे. शेवगाव शहराच्या नवीन पाणी योजनेचा खेळ सुरू असून, अधिकारी दबावात येत आहेत.

योजनेचे काम त्वरित सुरु करण्याची होत असलेल्या मागणीतून एक प्रकारे लोकप्रतिनिधींना चपराक देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. मात्र, स्वार्थासाठी जनतेच्या जीवाशी खेळू नका, असे नागरिकांतून बोलले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेवगाव शहरातील जनता पाण्यासाठी तडफडत आहे. महिन्यातून अवघे दोन ते तीन वेळेस येणार्‍या पाण्यामुळे सर्वांना हाल सोसावे लागत आहेत. शहराचा विस्तार वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. परंतु, कालबाह्य झालेली शेवगाव-पाथर्डी योजना, तसेच शहरात पाणी नियोजनाचा अभाव व अनधिकृत नळ जोडणी हे प्रश्न वेळोवेळी उपस्थित होऊनही कायम अनुत्तरितच राहिले. ते सोडविणारा कोणी वाली मिळालाच नाही.

नगरपरिषद स्थापनेनंतर पहिले प्राधान्य पाणी असेल, अशी अपेक्षा आजतागायत जायकवाडी धरणात बुडत राहिली. आताशी कोठे शहरात नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन ती प्रत्यक्षात उतरणार असल्याने नागरिकांच्या जीवात जीव आला होता. मात्र, त्यात स्वार्थी राजकारण शिरल्याने पुन्हा जीव घेण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. 87 कोटीच्या योजना कामासाठी पाच निविदा आल्या आहेत. त्या तांत्रिक उघडण्यात आल्या, आर्थिक निविदाचे काय ते अद्यापि समजेनासे झाले आहे. मात्र, ठराविक एका एजन्सीला या योजनेचे काम मिळण्यासाठी काहींची धडपड सुरू असल्याचे बोलले जात आहे.

वास्तविक तांत्रिक नंतर आर्थिक निविदा उघडल्यास ज्या एजन्सीची कमी दरात निविदा आहे, त्या एजन्सीची दोन दिवसांत अपूर्ण कागदपत्राची पूर्तता करून घेतल्यास योजनेचे काम वेळेत सुरू होऊ शकते. परंतु, आता हे काम प्रतिष्ठेचे केली जात असून, त्यात आर्थिक हित जोपासण्याचा प्रयत्न होत असल्याने, वरिष्ठ पातळीवरून दबावतंत्राचा वापर होत असल्याची चर्चा आहे. हा सारा खेळ टक्केवारीसाठी तर नसावा ना, अशीच शंका उपस्थित होत आहे.

दरम्यान ही योजना पूर्ण झाल्यानंतर शेवगावकरांची पाण्याची वणवण थांबणार आहे. त्यामुळे ती लवकर पूर्ण व्हावी, अशी त्यांना आस लागली आहे. मात्र, योजनेचे काम सुरु होण्याआधीच त्यात स्वार्थी राजकारण सुरु झाले आहे. स्वार्थासाठी जनतेच्या जीवाशी खेळू नका. अन्यथा याचे परिणाम आगामी निवडणुकीत भोगावे लागतील, असा इशारा संतप्त नागरिक देताना दिसत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT