अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : रेखा जरे खून खटल्याची न्यायालयीन सुनावणी सुरू झाली असून, पहिल्या साक्षीदाराची साक्ष सोमवारी (दि.3) न्यायालयात नोंदवण्यात आली. खटल्यातील इतर साक्षीदारांची साक्ष गुरुवारपासून (दि.13) नोंदवली जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू असून, विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव-पाटील यांनी पहिला साक्षीदार डॉ. बिपीन पायघन यांची साक्ष नोंदविली. सुनावणीच्या वेळी मुख्य आरोपी बाळ बोठेसह अन्य पाच आरोपींची नाशिक कारागृहातून ऑनलाईन (व्हिडिओ कॉन्फरन्स) उपस्थिती होती.
रेखा जरे हत्याकांडात एकूण बारा आरोपी आहेत. यापैकी 11 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले असून, एक महिला आरोपी फरार आहे. मुख्य आरोपी बाळ बोठे याच्यासह सहा आरोपी नाशिकच्या कारागृहात आहेत. दरम्यान, या खटल्याची सुनावणी येथील जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्यासमोर सोमवारपासून सुरू झाली आहे.
रेखा जरे यांच्या मृतदेहाचा पंचनामा डॉ. पायघन यांच्यासमोर नोंदवण्यात आला होता. या पंचनाम्याची माहिती त्यांनी सरतपासणीवेळी दिली. त्यानंतर एका आरोपीच्या वकिलांनी त्यांची उलटतपासणी घेतली. पुढील साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया 13 जुलैला होणार आहे. सुनावणीला चार आरोपी गैरहजर होते. नगरमधील एक आरोपी महेश तनपुरे न्यायालयात उपस्थित होता. सरकार पक्षाने 89 साक्षीदारांची यादी न्यायालयात दिली आहे. यापैकी 3 साक्षीदार प्रत्यक्ष घटना पाहणारे आहेत. या सर्व साक्षीदारांपैकी पहिल्या टप्प्यात 8 साक्षीदार यांची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सुनावणीवेळी बहुतांश आरोपींचे वकील न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे पहिल्या साक्षीदाराची उलट तपासणी आरोपींनी स्वतः घ्यावी, असे न्यायालयाने सुचवले. मात्र, आरोपींनी त्यास असमर्थता दर्शविली. पुढील सुनावणीच्या वेळी तुमचे वकील हजर ठेवण्याची जबाबदारी आरोपींवर राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
हेही वाचा