नगर : पुढारी वृत्तसेवा : रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सुत्रधार बाळ बोठे याच्याशी कोणताही संबंध नसल्याने गुन्ह्यातून वगळण्यात यावे, असा युक्तिवाद आरोपी अॅड.जनार्दन अकुला चंद्राप्पा याच्या वकीलांनी न्यायालयात केला. सरकारी पक्षाच्या वतीने यावर आक्षेप घेत वेळोवेळी आलेले एकमेकांचे संबंध व पुरावे न्यायालयात मांडण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांनी पुढील सुनावणी 14 जानेवारीला ठेवण्याचे आदेश दिले. जरे हत्याकांडातील दहा आरोपींवर आरोप निश्चित झाली असून इतर दोन आरोपींवर आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे.
बुधवारी (दि.4) पार पडलेल्या सुनावणीत अॅड.जनार्दन अकुला चंद्राप्पा या आरोपीच्या वकिलाने आरोप निश्चित होण्यावर येणार्या शनिवारपर्यंत मुदत मागितली होती. न्यायालयाने शनिवार पर्यंत आरोप निश्चित होण्याच्या प्रक्रियेवर युक्तिवाद करण्यासाठी मुदत दिली होती. तर आरोप निश्चित होणे बाकी असलेली महिला आरोपी पी. अनंतलक्ष्मी फरार आहे. शनिवारी (दि.7) रोजी झालेल्या सुनावणीत आरोपी अॅड. जनार्दन अकुला चंद्राप्पा याच्या वकीलांनी बोठेशी कोणताही संबंध नसल्याने गुन्ह्यातून वगळण्यात यावे असा युक्तिवाद केला. यावर सरकारी पक्षाचे वकिल उमेशचंद्र यादव पाटील यांच्या वतीने अॅड. सचिन पटेकर यांनी बाजू मांडली.
आरोपी अॅड.जनार्दन अकुला चंद्राप्पा याचा गुन्ह्यात संबंध असून त्यांच्या म्हणण्यानुसारच आरोपी पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी, राजशेखर अजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली या आरोपींनी बोठेला मोबाईल व सिमकार्ड वापरण्यासाठी दिल्याचे अॅड. पटेकर यांनी न्यायालयासमोर सांगितले. आरोपी जनार्दन अकुला चंद्राप्पा याच्यावरील आरोप निश्चितीवर येत्या 14 जानेवारीला निर्णय होणार आहे.