अहमदनगर

नगर : घर खरेदीचा टॉप गिअर..! 23 हजार 422 दस्तांची नोंदणी

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे सावट गेल्यानंतर जिल्ह्यातील खरेदी-विक्रीने टॉप गिअर टाकत वेग पकडला आहे. मागील नऊ महिन्यांत अहमदनगर शहरात तब्बल 8 हजार 978 घरांची खरेदी-विक्री झाली आहे. याशिवाय मोकळे भूखंड व शेतजमिनीचे व्यवहार देखील झाले आहेत. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दोन, नगर तालुक्यात तीन व उर्वरित बारा तालुक्यांत प्रत्येकी एक असे एकूण 17 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. जिल्हा मुद्रांक व सहनिबंधक कार्यालयाला यंदा 330 कोटी रुपये महसूल गोळा करण्याचे टार्गेट आहे.

अहमनगर शहरात तीन दुय्यम निबंधक कार्यालये असून, एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत एकूण 23 हजार 422 दस्तनोंदणी झालेली आहे. उत्तर विभागाच्या कार्यालयात नऊ महिन्यांत 7 हजार 843 दस्तनोंदणी झाली. यामध्ये 3 हजार 218 दस्त फ्लॅट व रो हाऊसिंग खरेदी व विक्रीचे आहेत. या कार्यालयाला 33 कोटींचे टोर्गट दिले. मात्र, आतापर्यंत 38 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

नगर शहरातील दक्षिण कार्यालयात 9 हजार 700 दस्तनोंदणी झाली. यामध्ये फ्लॅट व रो हाऊसिंगच्या 2 हजार दस्तांचा समावेश आहे. याशिवाय 4 हजार 700 मोकळ्या भूखंडाची देखील खरेदी -विक्री झालेली आहे. अहमनगर शहरातील तिसर्‍या कार्यालयात 5 हजार 879 दस्तनोंदणी झाली. यामध्ये 3 हजार 760 फ्लॅट व रो-हाऊसिंग व वैयक्तिक घरांच्या दस्तांचा समावेश आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत शेती, भूखंड, घरे यांच्या खरेदी-विक्री व्यवसाय मंदावला होता. यंदाच्या आर्थिक वर्षात मात्र, खरेदी-विक्री वाढलेली दिसून आली आहे.

श्रीरामपूर तालुक्यात देखील मोकळे भूखंड व घरांची खरेदी विक्री अधिक झाली आहे. संगमनेर, अकोले, कोपरगाव, शिर्डी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व जामखेड या तालुक्यांत झालेल्या दस्तनोंदणीत शेतजमिनीच्या खरेदी विक्रीचे प्रमाण अधिक असल्याचे जिल्हा सहनिबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाने नमूद केले.

जिल्ह्यात 290 कोटींचा महसूल
एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत खरेदी खत, साठेखत, गहाण खत, रक्तातील नात्यामधील बक्षीसपत्र, हक्कसोड, भाडेकरार या माध्यमातून जिल्ह्यात 85 हजार 378 दस्तनोंदणी झाली. त्यामुळे मुद्रांक व नोंदणी फीच्या माध्यमातून 290 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. उर्वरित तीन महिन्यांत 40 कोटींचे टार्गेट पूर्ण करावयाचे आहे.

गेल्या वर्षी 99 टक्के महसूल गोळा
1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या आर्थिक वर्षासाठी ला 329 कोटींचे टार्गेट होते. 94 हजार 225 दस्तनोंदणी होऊन शासनाच्या तिजोरीत 326 कोटींचा महसूल जमा झाला होता. एकंदरीत 99 टक्के महसूल वसूल करण्यात यश आले होते.

SCROLL FOR NEXT