वाळकी; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे वाळकी, गुंडेगाव परिसरातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. त्याची भरपाई शासनाकडून अद्यापि मिळाली नाही, पण कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकर्यांच्या डोळ्यात कांद्यानं पाणी आणलं आहे. कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीचा थेट फटका शेतकर्यांना बसला आहे. कांदा उत्पादक हा व्यापार्यांच्या हातचं बाहुलं बनला आहे. एरव्ही चढ्या भावानं ग्राहकांच्या डोळ्यांत आनंदाने पाणी आणणारा कांदा आज भाव पडल्यानं शेतकर्यांना रडवतोय.
यंदा उशिराच्या खरीप कांदा लागवडीला सुरुवातीपासून वातावरणातील बदलाचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे कांदा रोपांचे नुकसान झाले. लागवड केलेल्या कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. ऑक्टोबरअखेर पाऊस सुरू असल्यामुळे कांदा लागवड हंगाम महिनाभर लांबला. त्यामुळे कांदा उत्पादनात घट झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून कांद्याची काढणी सुरू झाल्यामुळे बाजारात नव्या कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दर कोसळले आहेत. काही शेतकरी शेतातील कांद्याचे पीकच काढून टाकत आहेत.
कारण कांद्याला मिळणार्या दरात शेतकर्यांचा उत्पादन खर्च देखील निघणं शक्य होत नाही. त्यामुळं शेतकर्यांना आर्थिक फटका बसत आहे. नगर तालुक्यातील वाळकी, गुंडेगाव येथील अनेक शेतकर्यांनी कांद्यावर रोटाव्हेटर फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. खतांचे भाव गगनाला भिडले असताना देखील कांदा चांगला यावा, म्हणून त्यांनी खतांचा वापर केला. कुटुंबासह अपार कष्ट करून कांद्याचे पिक देखील त्यांनी जोमात आणले. परंतु, आता कांद्याचे भाव पाच ते सहा रूपये किलोवर आले आहेत. एवढ्या दराने कांद्याची विक्री केली, तर त्यासाठी खर्च केलेले पैसे शेतकर्यांच्या हाती पडत नाही. त्यामुळे त्यांच्यांवर कांदा पिकावर थेट ट्रॅक्टर रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ आली आहे.
उत्पादन कमी खर्च जास्त
कांदा उत्पादनासाठी एकरी 60 ते 65 हजार रुपये खर्च येतो. बियाणे 10 हजार, लागवड 10 हजार, निंदणी 5 हजार, फवारणी 8 हजार, रासायनिक खते 10 हजार, काढणी काटणी 10 हजार, भराई मजुरी 2 हजार, वाहतूक 3 हजार रुपये खर्चाचा त्यात समावेश आहे.
लाल कांद्याला दोन हजार रुपये क्विंटलचा दर मिळणे अपेक्षित होते. मात्र, लाल कांदा सातशे रुपये क्विंटलपर्यंत आला आहे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे.
– प्रदीप भापकर, शेतकरी, गुंडेगाव