अहमदनगर

नगर : मच्छिंद्रनाथांच्या दर्शनासाठी विक्रमी गर्दी

अमृता चौगुले

मढी : पुढारी वृत्तसेवा  : मायंबा येथे यात्रेनिमित्त राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. शनिअमवस्या व मच्छिंद्रनाथांच्या यात्रेचा योग जुळून आला होता. ही पर्वणी साधत नाथभक्तांची अलोट गर्दी झाली होती.  मच्छिंद्रनाथांच्या जयजयकाराने मिंंदर परिसर दुमदुमून गेला होता. होणारी गर्दी लक्षात घेऊन मच्छिंद्रनाथ देवस्थान समितीतर्फे मंदिर परिसरातील सुमारे शंभर एकर जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, गर्दीमुळे ही व्यवस्थाही अपुरी पडली. मायंबा गडाकडे येणारे सर्वच रस्ते गर्दींनी फुलून गेले होते. पौष अमावस्या, मच्छिंद्रनाथ यात्रेचा मुख्य दिवस असतो. वर्षभरात पौष अमावस्या, गुढीपाडवा समाधी उत्सव, मच्छिंद्रनाथ जन्मोत्सव, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक मायंबा येथे दर्शनासाठी येतात.

शनिवारी पहाटे नाथांच्या महाआरतीनंतर यात्रेस प्रारंभ झाला. नाशिक, पुणे, औरंगाबाद, लोणावळा, बीड, आष्टी, गंगापूर, ठाणे या भागांतील भाविकांनी शुक्रवारी रात्रीच गर्दी केली होती. नगर, आष्टी, धामणगाव, पाथर्डी व परिसरातील वाड्या-वस्त्या, तांडे येथून पायी येणार्‍या भाविकांची संख्या लक्षणीय होती. अलोट गर्दीमुळे बहुसंख्य भाविक गोशाळेच्या आवारात व रस्त्याच्या कडेला वाहने लावत पायी चालत मंदिराकडे आले. मायंबा ते सावरगावपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

देवस्थान समितीतर्फे निवास व्यवस्था, पार्किंग, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी पुरविण्यात आले. यात्रेत दुकानांची मंदिर परिसरात व्यवस्था केल्यामुळे भाविकांना गर्दीचा त्रास झाला नाही. लाखो भाविकांनी मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात भाविकांना जेवणाची व्यवस्था होती. यात्रेनिमित्त मच्छिंद्रनाथांच्या समाधी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने रात्री मंदिर खुलून दिसत होते. मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक फुले व फुग्यांनी केलेली सजावट येणार्‍या भाविकांचे लक्ष वेधत होती. दुपारी देवतलाव येथून काठी मिरवणूकवाजत-गाजत निघाली. नाथांचे अश्व, भगवे निशान या मिरवणुकीत होते. गुलालाची उधळण, फटाक्याची आतषबाजी, बँड पथक, ढोल-ताशांच्या निनादात काठी मिरवणूक मंदिरस्थळी आली.

शुद्ध तुपात तयार केलेले रोटे भाविकांना वाटण्यात आले. दरवर्षीप्रमाणे नगरचे नवनाथ सेवा मंडळाने दिवसभर भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे सचिव बाबासाहेब म्हस्के, विश्वस्त अनिल म्हस्के यांनी भाविकांचे स्वागत केले. सर्व विश्वस्त मंडळ, सावरगाव ग्रामस्थ व कर्मचार्‍यांनी यात्रा नियोजनासाठी परिश्रम घेतले. आज (दि 22) कुस्त्यांचा जंगी हंगामा होऊन धर्मनाथ बिजेला यात्रेची सांगता होईल.

शनि अमावस्येनिमित्त श्रीक्षेत्र मढी येथेही लाखो भाविकांनी चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. सकाळी नऊ वाजल्यापासूनच तिसगाव-मढी रस्त्यावर वाहतूक कोंडीला सुरुवात झाली होती. रस्त्याच्या कडेला पडलेल्या खडीमुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होत होती. त्यामुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला.

ऐनवेळी निवडुंगे मार्गे वाहने वळविल्याने दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली. दिवसभर एकेरी वाहतूक ठेवण्यात आली होती. आमदार संग्राम जगताप यांनी देवस्थानला भेट देऊन कानिफनाथांचे दर्शन घेतले. मढी देवस्थान समितीने भाविकांना सुविधा देत योग्य नियोजन केले. देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, सचिव विमलताई मरकड, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त रवींद्र आरोळे, शामराव मरकड, सहसचिव शिवजित डोके यांनी भाविकांचे स्वागत केले.

पायी येणार्‍या भाविकांची संख्याही लक्षणीय

नवीन वर्षात मढी, मायंबा येथे आजची गर्दी हा विक्रमी ठरली. मच्छिंद्रनाथांचा गड निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने पायी येणार्‍या भाविकांची संख्याही लक्षणीय होती. दाट झाडे, लहान-मोठे कोरडे ओढेे, त्यातील शुभ्र दगड, तसेच माकड, हरीण, काळविट, ससे, मोरांच्या दर्शनाने भाविकांचा प्रवास अविस्मरणीय ठरला. भाविक गर्भगिरी डोंगराच्या दर्‍याखोर्‍यातून कुटुंबासह चालत येऊन नाथांच्या चरणी नतमस्तक झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT