जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अहिल्यादेवी होळकर जयंती झाल्यानंतरही आमदार प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे दिसत आहे. दोन्ही आमदार एकमेकांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत आहेत. यास निमित्त ठरले ते बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचे नामांतराचे.
बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यादेवी जयंतीनिमित्त 31 मे रोजी चौंडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनातर्फे मंत्री गिरीश महाजन यांनी बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण करून अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय असे केले.
उत्तर देताना आमदार रोहित पवार म्हणाले, 'मी तीन दिवस चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात व्यस्त होतो. हे मान्य केल्याबद्दल राम शिंदे यांचे आभार! आपण तर शासकीय कार्यक्रमाचे आयोजक असतानाही आपले लक्ष केवळ व्यासपीठावर आणि भाषणावर होते. यावेळी अभिवादनासाठी येणार्या लोकांचे नियोजन, भोजन, स्मारकाचे सुशोभिकरण आणि इतर सेवेकडे आपले पूर्ण दुर्लक्ष होते.
आम्ही मात्र राजकारण न करता तुम्ही ठेवलेल्या त्रूटी जाणवणार नाही, यासाठी सर्वांनी मिळून लोकांची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. याचे आपणही साक्षीदार आहात. राहिला प्रश्न उपस्थित केलेल्या बारामतीच्या लोकप्रतिनिधीचा. तर, मी बारामतीचा लोकप्रतिनिधी नाही, तर लोकांच्या आशीर्वादाने 42 हजार मताधिक्याने निवडून आलेला कर्जत-जामखेडचा लोकप्रतिनिधी आहे. वस्तुस्थितीचा चार वर्षांनी तरी स्वीकार करा.
दुसरे म्हणजे नामकरणाचे स्वागत केल्याची प्रतिक्रिया देणारा आणि दिल्लीत महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हलविल्याच्या घटनेवर आवाज उठवणाराही मी पहिला असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने माध्यमात बघितले. आपण मात्र यावर ब्र शब्दही काढला नाही. त्यामुळं सोईचे राजकारण करणे बंद करून विकासाचे राजकारण करायला शिका, असा टोला आमदार पवार यांनी लगावला आहे.
बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण करून दोन दिवस झाले तरी आमदार रोहित पवार व बारामतीच्या लोकप्रतिनिधींनी या निर्णयाचे अद्यापपर्यंत स्वागत का केले नसावे? असा प्रश्न आमदार राम शिंदे यांनी उपस्थित केला.
माझी जन्मभूमी बारामती असली तरी कर्जत-जामखेडनेच मला लढायला शिकविले आणि ती लढाई कशी झाली, हे आपल्याला चांगले ठाऊक आहे.