जामखेड : राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात झालेल्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कर्जत-जामखेडमधून पुन्हा एकदा माजी मंत्री प्रा.राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार असा विधानसभेचा सामना रंगला होता. आ. रोहित पवार हे 1243 मतांनी विजयी झाले. परंतु महायुतीची सत्ता राज्यात आल्याने विधानपरिषदेचे भाजपचे आमदार राम शिंदे यांचे गड आला पण सिह गेला अशी परिस्थिती झाली. परंतु भाजप पक्षाने त्यांची दखल घेत त्यांना विधान परिषद सभापती पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उद्या विधानपरिषद सभापती पदाचा अर्ज भरणार असल्याचे आ. राम शिंदे यांनी दै. पुढारी शी बोलताना सांगितले.
आ. राम शिंदे यांनी सन २००९ ते २०१४ व २०१४ ते २०१९ असे सलग दोन निवडणुकीत कर्जत जामखेडचे प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. तसेच सन २०१४ ते २०१९ या काळात त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मंत्री मंडळात स्थान मिळाले होते. त्यांनी जलसंधारणच्या कामाची नवी ओळख दिली होती. तसेच त्यांनी १२ खात्याचा कारभार पहिला आहे. सुरुवाती पासूनच ते स्व. गोपीनाथ मुंडे आणि त्यांनतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. आता पुन्हा आ. राम शिंदे यांना भाजपने नवीन जबाबदारी दिली आहे. त्यांना विधानपरिषद सभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच कर्जत जामखेड मतदार संघात आनंद उत्सव साजरा केला.