अहमदनगर

नगर : भाजपाच्या बैठकीकडे राहुरीकरांचे लागले लक्ष

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी तालुका भाजप कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक दोन्ही माजी आमदारांच्या उपस्थितीत आज (दि. 2) होणार आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या उपस्थितीमध्ये तालुका अध्यक्षपदाची निवड होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. सन 2009 ते 2019 या काळामध्ये भाजपची सत्ता राहुरी तालुक्यामध्ये होती. त्या काळी भाजप पक्षाला 'अच्छे दिन' आल्याने कार्यकर्त्यांची मोठी गर्दी माजी आमदार कर्डिले यांच्या अवतीभोवती होती. दरम्यान, सन 2019 मध्ये राहुरी मतदार संघात मोठा उलटफेर झाला. माजी आ. कर्डिले यांचा पराभव तर राष्ट्रवादीचा विजय होऊन आमदार प्राजक्त तनपुरे यांना संधी लाभली. राज्यात सत्ताबदल तर राहुरीतही लोकप्रतिनिधी पद गेल्याने भाजपमध्ये मरगळ आली होती. इतकेच नव्हे तर भाजपचे तालुका अध्यक्ष अमोल भनगडे यांनी राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

भाजप पक्ष सैरभैर झाला असतानाच अडीच वर्षातच हवा फिरली. राज्य शासन कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस यांच्या रुपाने भाजपची पुन्हा सत्ता स्थापन झाली. या सत्तेमध्ये भाजपचे नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठी संधी लाभली. राज्यातील महत्त्वाचे महसूल मंत्री पदासह जिल्ह्याचे पालकत्व ना. विखे यांना लाभले. राहुरीत पुन्हा विखे-कर्डिले जोडीला बहर आला. खासदार डॉ. सुजय विखे व माजी आ. कर्डिले यांनी पुन्हा एकमेकांच्या हातात देत राहुरीची मोट बांधण्यास प्रारंभ केला. कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांची गर्दी भाजपकडे जमा होत असल्याचे दिसत आहे.

पक्षाला सोडून गेलेले भनगडे यांनीही पुन्हा स्वगृही प्रवेश केला. त्यानंतर विखे-कर्डिले यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी घेतलेली पराकाष्ठा पाहता राहुरीत भाजप पक्ष बळकटी मिळविण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचाचयत समिती, नगरपरिषदेच्या निवडणुकांसह सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी सर्व पदाधिकारी, गट प्रमुख, गण प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख यांच्या उपस्थितीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, माजी आमदार कर्डिले, माजी आमदार कदम यांच्या मार्गदर्शनामध्ये बैठक होणार आहे. ही बैठक शहरातील मुळाप्रवरा वीज संस्थेमधील खा. डॉ. विखे यांच्या कार्यालयात दुपारी 2 वाजता आज आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये तालुका अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात जाणार याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

यांची नावे आघाडीवर
राहुरी तालुका भाजपच्या तालुका अध्यक्षपद निवडीसाठी विक्रम तांबे, विजय बानकर, अमोल भनगडे, सुरेश बानकर, रवींद्र म्हसे, सुकुमार पवार, राजेंद्र गोपाळे, जब्बार पठाण, विजय कानडे, संदीप गिते आदींपैकी एकाला संधी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कर्डिले गट की विखे गट
राहुरीत पूर्वीपासूनच भाजपमध्ये दोन गटांचे राजकारण असते. कर्डिले-गांधी गटानंतर सद्यस्थितीला विखे-कर्डिले गट अस्तित्वात आहे. नेते एकत्र असले तरीही दोन्ही गटांची रणनिती वेगवेगळी ठरते, हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे तालुका अध्यक्षपदाची माळ विखे की कर्डिले गटाला लाभणार? याचा फैसला माजी आमदार कर्डिले यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT