अहमदनगर

कोपरगाव : श्री गणेश साखर कारखान्याची मालमत्ता आमच्या ताब्यात द्यावी

अमृता चौगुले

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहाता तालुक्यातील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. कारखान्याच्या सर्व स्थावर व जंगम मालमत्तेची जपणूक होण्याच्या दृष्टीने कारखाना कार्यस्थळावरील सर्व कागदपत्रे, स्थावर व जंगम मालमत्तेचा वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पंचनामा व व्हिडीओ चित्रीकरण करून ती संपूर्ण कागदपत्रे व मालमत्ता नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात यावी.

तसेच गणेश कारखाना भाडे तत्त्वावर चालविण्यास देण्याबाबत कुठलाही बेकायदेशीर करार करू नये, अशी मागणी श्री गणेश परिवर्तन मंडळाच्या नवनिर्वाचित संचालकांनी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे करण्यात आली. गणेशनगर (ता. राहाता) येथील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक 17 जून रोजी पार पडली. 19 जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.

या निवडणुकीत ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात व कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील श्री गणेश परिवर्तन मंडळाने एकूण 19 पैकी 18 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. ऐतिहासिक ठरलेल्या या निवडणुकीत गणेश कारखान्याच्या सभासद शेतकर्‍यांनी सत्तांतर घडवून कोल्हे-थोरात युतीच्या श्री गणेश परिवर्तन मंडळाच्या ताब्यात एकहाती सत्ता दिली आहे.

गणेश साखर कारखान्याच्या निवडणूक निकालानंतर श्री गणेश परिवर्तन मंडळाच्या नवनिर्वाचित संचालकांनी बुधवारी (21 जून) पुणे येथे साखर आयुक्तालयात आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. हे निवेदन देताना गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अ‍ॅड. नारायणराव कार्ले, डॉ. एकनाथ गोंदकर, नूतन संचालक बाबासाहेब डांगे, विजय दंडवते, संपत हिंगे, अनिल टिळेकर, बाळासाहेब चोळके, मधुकर सातव, महेंद्र गोर्डे, नानासाहेब नळे, सुधीर लहारे, अनिल गाढवे, विष्णुपंत शेळके, संपतराव चौधरी, आलेश कापसे, अरविंद फोपसे आदी उपस्थित होते.

साधनसामुग्री सुस्थिती असणे गरजेचे

श्री गणेश सहकारी साखर कारखाना सुरू असताना कारखान्यामध्ये असलेले कागदपत्र, ऊस गाळप करण्यासाठी कारखान्याला लागणार्‍या सर्व मशिनरी, उत्पादित झालेली साखर व इतर उपपदार्थ तसेच कारखान्याच्या मालकीची इतर सर्व साधनसामग्री सुस्थितीत असणे आवश्यक आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT