अहमदनगर

नगर जिल्ह्यातील 259 गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार!

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील गावोगावच्या गावठाणातील घरे आणि जागांचा ड्रोनद्वारे सर्व्हे केला जात आहे. अकोले वगळता उर्वरित 13 तालुक्यातील ड्रोन फ्लाईंग मोजणीचे काम शंभर टक्के झाले आहे. आता नकाशे तयार होऊन चौकशीनंतर संबंधित गावे आणि त्यातील मालकी असलेल्या नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील 259 गावांमधील प्रॉपर्टी कार्ड तयार झाले आहे. पूर्वी मूळ सर्व्हे हा शेतजमिनीचाच झाला होता. त्यावेळी गावठाणचा सर्व्हे झालेला नव्हता. त्यामुळे गावठाणमधील नकाशे नव्हते, कोणाचे अतिक्रमण आहे, तेही सिद्ध होत नव्हते.

केवळ ग्रामपंचायतीचा उतारा हाच एकमेवर आधार असायचा. राज्यात अशाप्रकारे 40 हजार गावठाण असून, त्यांची नकाशे प्रशासनाकडे नव्हते. त्यामुळे 2021 मध्ये केंद्र सरकारने स्वामीत्व योजनें तर्गत गावठाणचे नकाशे तयार करून प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यासाठी काम सुरू केले. ड्रोनद्वारे गावठाण मोजणीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या खुल्या जागा, घरे, रस्ते, नाले यांचे क्षेत्र व सीमा निश्चित केल्या आहेत. सर्वेक्षण झालेल्या गावामध्ये चौकशीचे कामही अंतिम टप्यात आहे. त्यानंतर मिळकतीचा नकाशा तयार होईल. याशिवाय कायदेशीर हक्काचा अधिकार अभिलेख मिळकत पत्रिका स्वरुपात तयार होणार आहे. मिळकत पत्रिका तयार झाल्याने त्यावर कर्ज घेणे सुलभ होणार आहे. ड्रोनद्वारे मोजणीत प्रत्येक गावठाणातील मालमत्तांची मोजणी अवघ्या 10 ते 15 मिनिटांत पूर्ण होत आहे. या मोजणीमध्ये गावठाणातील गावांची हद्द, मालमत्तांचे क्षेत्र, मालकी रस्ते आदी माहिती उपलब्ध होणार आहे.

स्वामित्व योजनेमुळे प्रत्येकाला त्यांच्या मालकी हक्काचा पुरावा, सनद व नकाशा मिळणार आहे. आतापर्यंत 259 गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झालेले आहेत. तसेच उर्वरित राहिलेल्या गावांचे चौकशी काम पूर्ण करण्याचे नियोजन झाले आहे. दरमहा 50 गावे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ग्रामपंचायतींचे यातून उत्पन्न वाढेल, व नागरिकांना मिळकतीवर तारण कर्ज मिळू शकणार आहे.
                             – सुनील इंदुलकर , जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नगर

3 तालुक्यांमध्ये ड्रोनद्वारे मोजणी पूर्ण!
जिल्ह्यातील नगर, राहुरी, श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, संगमनेर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या तालुक्यातील गावठाण असलेल्या गावातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणीचे काम झाले आहे. तर अकोलेत युद्धपातळीवर काम सुरू आहे. या ठिकाणी मिळकतीची चौकशी काम सुरू होते. ड्रोनफ्लार नंतर सर्व्हे ऑफ इंडियाकडून नकाशे भूमी अभिलेख कार्यालयास उपलब्ध होतात. त्यानंतर या मिळकतींचा जीआयएस एरिया काढला जातो.

855 गावांत ड्रोन फ्लाईंग सर्व्हे पूर्ण!
नगर जिल्ह्यातील 1031 गावांपैकी 855 गावात ड्रोन फ्लाईंग सर्व्हे पूर्ण झाले आहे. हे ड्रोन फ्लाईंग झाल्यानंतर आता मिळणार्‍या नकाशांतून जीओ मॅप तयार केला जाईल. त्यात अक्षांश रेखांशद्वारेचे ते नकाशे असणार आहेत. त्यानंतर संबंधित नकाशांच्या आधारे अधिकार्‍यांकडून प्रत्यक्षात मालकीची पाहणी होईल. काही त्रुटी किंवा चूक आढळल्यास त्यात दुरुस्ती होऊन प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आहे.

प्रॉपर्टी कार्ड धारक गावांची संख्या!
राहाता 19, संगमनेर 62, राहुरी 46, नगर 54, जामखेड 55, श्रीरामपूर 17, नेवासा 6 अशा संबंधित 259 गावांचे चौकशीचे काम पूर्ण झाले आहे, त्यामुळे 259 गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झालेले आहेत. तसेच 102 गावे परीक्षणासाठी उपलब्द्ध झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT