नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात सभा, महासभा, आंदोलने व जातीय संवेदनशील वातावरण लक्षात घेऊन, जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलिस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 19 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्यात येणारी अशी कोणतीही वस्तू, दाहक किंवा स्फोटक पदार्थ, क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगता येणार नाहीत.
व्यक्तीचे अथवा मृतदेहांचे किंवा त्यांच्या आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन, आवेशपूर्ण भाषणे, हावभाव किंवा सोंग, तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे आदी कृत्यांना मनाई आहे. सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास तसेच पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास या आदेशाने मनाई केली.