अहमदनगर

ठाकरे गटाच्या मोर्चात आ. तनपुरे अन् लंकेही ! जमिनी हडपणार्‍यांवर कारवाईची मागणी

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या काही वर्षांपासून अहमदनगर शहरातील सर्वसामान्य जनतेला दमदाटी करून त्यांच्या जागा बळकावण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करत, गोरगरिबांच्या जागेवर कब्जा करून धमकावणारे व त्यांना मदत करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे (ठाकरे) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि आमदार नीलेश लंके हेदेखील उपस्थित होते.

नगर शहरामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक परस्पर आमच्या जमिनी लाटत आहेत. त्यांना काही अधिकारी मदत करीत आहेत. अशा तक्रारी शिवसेनेकडे (ठाकरे गट) दाखल झाल्या. याबाबत न्याय मिळावा आणि त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा इशारा महाविकास आघाडीने दिला होता. त्यानुसार ठाकरे शिवसेनेचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि आमदार नीलेश लंके उपस्थित होते.

निवेदनात म्हटले की, गावखेड्यातील अनेक नागरिकांनी नगर शहरात जागा घेतलेल्या आहेत. मात्र, या जागांच्या सातबारा उतार्‍यांवर परस्पर नोंद करून त्या हडपल्या जात आहेत. खोट्या व्यक्ती उभ्या करून आणि खोट्या सह्या करून हे प्रकार सुरू आहेत. याबाबत तक्रार केल्यास संबंधित जागामालकांना धमकावले जात आहे. हे गुंड प्रवृत्तीचे लोक अधिकार्‍यांना हाताशी धरून असे बेकायदा कृत्य करत आहेत, असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाद्वारे केला.

जमिनी हडपणार्‍यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा. तसेच याबाबत चौकशी समिती नियुक्त करून महिनाभरात संबंधित जनतेला न्याय द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना पक्षाने दिला आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भगवान फुलसौंदर, गिरीश जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दिलीप सातपुते, योगीराज गाडे, अमोल येवले, अशोक दहिफळे, संजय आव्हाड, पप्पू भाले, मुन्ना भिंगारदिवे, अरुण झेंडे, राजेंद्र भगत, शरद कोके, अक्षय नागापुरे हे उपस्थित होते.

जनता दरबाराचे आयोजन करुन प्रश्न सोडवा
जिल्हाधिकार्‍यांनी जनता दरबाराचे आयोजन करून या अन्यायग्रस्त जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी आमदार तनपुरे आणि आमदार लंके यांनी केली. कब्जा झालेल्या जागामालकांचे अनुभव विक्रम राठोड यांनी सांगितले. या वेळी मूळ मालक कागदपत्रांसह उपस्थित होते. त्यांनीही अनुभव सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT