नेवासा; पुढारी वृत्तसेवा : सुरेगाव – नेवासा रस्त्याची मोठी दूरवस्था झाली आहे. त्यामुळे अर्धवट राहिलेले हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नेवासा तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील पुनर्वसित गावाच्या सुरेगाव गंगा ते नेवासा दरम्यान असलेल्या सात किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून वाहतुकीची साधने नेणे-आणणे अवघड होत आहे.
गेल्यावर्षी गावालगतच्या एक किलोमीटर रस्त्याचे काम झाले, परंतु मध्येच शंभर फूट काम अपूर्ण राहिल्याने रस्ता अधिकच खराब झाला आहे. यामुळे वाहतुकीला अडचणी येत आहेत. संबंधित कंत्राटदार यांनी हे काम पूर्ण केले नाही. तेव्हापासून या रस्त्याचे काही काम अपूर्ण आहे. पुलाचे कामही अपूर्ण आहे. तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या काम पूर्णत्वाच्या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी या भागातील नागरिकांनी मागणी केली आहे.
दरम्यान, हा रस्ता अपूर्ण असल्याबद्दल संबंधित अभियंता यांनी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर रस्त्याची अवस्था लक्षात येईल. साईड पट्ट्या दुरुस्त नसल्याने पायी चालतानाही कसरत करावी लागते. तातडीने या अपूर्ण कामाला सुरूवात करावी, रस्ताचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे.