अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासह देशाचा सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी देशात जातीपातीचे राजकारण करून द्वेष निर्माण करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. दलित, आदिवासी समाज भाजपकडे वळत असल्याचे कारण त्यापाठीमागे आहे. त्यात फूट पाडण्याचे काम विरोधी राजकीय पक्षांकडून होत आहेे, असा आरोप भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी केला.
लव्ह जिहाद प्रकरणी कर्जत तालुक्यातील कुटुंब न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. त्या कुटुंबीयांची भेट घेऊन साबळे यांनी त्यांना दिलासा दिला. या कुटुंबीयांनी उपोषण मागे घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर साबळे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी आमदार राम शिंदे, अभय आगरकर, दिलीप सातपुते, मनीष साठे, सुवेंंद्र गांधी उपस्थित होते.
साबळे म्हणाले, कर्जत तालुक्यातील अल्पवयीन मुलीला परधर्मीय मुलाने पळून नेले. हा लव्ह जिहादचा प्रकार आहे. आमची मुलगी आम्हाला आणून द्या, या मागणीसाठी मुलीच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. मुलीच्या वडिलांची तब्येत ढासळल्याने त्यांना रुग्णालयात पाठविले असून, उपोषण तूर्त पाच दिवस स्थगित केेले आहे.
यासंदर्भात पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट घेतली असून, त्या कुटुंबाला संरक्षण देण्यात आले आहे. तसेच, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब लावला. त्यामुळे त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.