नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या दहा-बारा वर्षांपासून रखडलेल्या पोलिस पाटील भरतीस शासनाने हिरवा कंदिल दिलेला आहे. मात्र, महसूल विभागाच्या कार्यबाहुलेपणामुळे भरती प्रक्रियेस विलंब होत होता. सध्या जिल्ह्यात 822 पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यास अखेर जिल्हा प्रशासनाला मुहूर्त मिळाला असून, पोलिस पाटील भरती कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 15 जून 2023 रोजी पोलिस पाटील पदासाठी लेखी परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील 1 हजार 443 गावांसाठी पोलिस पाटलांची पदे मंजूर आहेत. निधन, वय व इतर कारणामुळे पोलिस पाटलांची पदे रिक्त होत आहेत. मात्र भरती प्रक्रिया वेळेत राबवली गेली नसल्याने रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 2013 मध्ये जिल्ह्यात भरती प्रक्रिया राबवली होती. त्यावेळी फक्त श्रीरामपूर व संगमनेर विभागात भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून रिक्त जागांची संख्या 822 पदांवर पोहोचली आहे.
जिल्ह्यात सध्या पोलिस पाटलांची 57 टक्के पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पोलिस प्रशासनाना अडचणी येत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त पदे भरण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने बिंदुनामावलीसाठी धावपळ सुरु होती. बिंदुनामावलीस मंजुरी मिळाल्यानंतर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडून गावनिहाय लोकसंख्येची माहिती मागवली गेली. त्यानंतर आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानंतर पोलिस पाटील भरती प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम प्रसिध्द केला. त्यानुसार 15 मे रोजी जाहीरनामा प्रसिध्द होणार आहे. 30 जून रोजी पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या फलकावर प्रसिध्द होणार आहे.
तालुकानिहाय रिक्त जागांची संख्या
अकोले 71, संगमनेर 66, कोपरगाव 31, राहाता 19, श्रीरामपूर 19, राहुरी 45, नेवासा 38, नगर 83, पाथर्डी 109, शेवगाव 82, कर्जत 69, जामखेड 45, पारनेर 108, श्रीगोंदा 37.
पोलिस पाटील भरतीचा कार्यक्रम
15 मे रोजी जाहीरनामा प्रसिद्ध होणार
16 मे ते 26 मेपर्यंत अर्ज भरण्यास मुदत
29 मे ते 30 मे अर्जांची छाननी
5 जूनला पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द
15 जून 2023 रोजी लेखी परीक्षा
20 जूनला उत्तीर्ण उमेदवारांची यादी
22 जून रोजी मूळ कागदपत्रांची छाननी
27 जून रोजी तोंडी परीक्षा
30 जून रोजी पात्र उमेदवारांची अंतिम यादी.